बिबट्या मंत्र्यांच्या बंगल्याकडे, की मंत्र्यांचे बंगलेच बिबट्याच्या क्षेत्राकडे - Leopard to the minister's bungalow, or the minister's bungalow to the leopard area | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

बिबट्या मंत्र्यांच्या बंगल्याकडे, की मंत्र्यांचे बंगलेच बिबट्याच्या क्षेत्राकडे

मुरलीधर कराळे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

अकोले तालुक्यात अनेक आदिवासींची मुले बिबट्याने फस्त केली. पाथर्डीत नरभक्षक बिबट्याने तिन बालकांचा जीव घेतला. एरवी बिबट्याने एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय पिंजरे न आणणारे वनखाते कधी नव्हे जागृत झाले.

नगर : `बिबट्याच्या क्षेत्रात माणूस की माणसांच्या वस्तीत` बिबट्या हा बाैद्धिक वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्यक्षात बिबट्या भक्षाच्या शोधात फिरत असताना तो मनुष्य वस्तीकडे येतो. मनुष्य वस्ती हळूहळू शेतात विस्तारू लागली आहे. वनात आदिवासींच्या वस्त्या होऊ लागल्या आहेत. मंत्र्यांचे आलेशान बंगलेही त्यांच्या शेतात निवांत ठिकाणी होत आहेत. साहजिकच बिबट्याच्या कार्यक्षात्रात मनुष्याचे अतिक्रमण होते, असे म्हणण्यास वाव आहे.

अकोले तालुक्यात अनेक आदिवासींची मुले बिबट्याने फस्त केली. पाथर्डीत नरभक्षक बिबट्याने तिन बालकांचा जीव घेतला. एरवी बिबट्याने एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय पिंजरे न आणणारे वनखाते कधी नव्हे जागृत झाले. नुकतेच मंत्र्यांच्या बंगल्यावर, शेतावर बिबट्यांचे दर्शन झाल्याने वनखाते अधिकच जागृत झाले असावे. सर्वसामान्यांची फोन करूनही ही मंडळी हालत नाहीत. अजून कोणी पाहिला का, खरंच बिबट्या होता का, बिबट्याचे ठसे तपासावे लागतील, अशा कारणांची सरबत्ती होते. एकाद्याचा जीव गेल्यानंतर वनखाते जागे होते व पिंजरा लावते, हा शेतकऱ्यांचा सर्रास अनुभव आहे.

काल जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील बंगल्याजवळ बिबट्याचे दर्शन झाले. त्याआधीही उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बंगल्याजवळ बिबट्याची गस्त झाली होती. याच दरम्यान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतात त्यांची नातवंडे खेळत असताना बिबट्या जवळून गेला. या सर्व घटनांमध्ये वनविभाग तातडीने सक्रीय होऊन संबंधित ठिकाणी लगेचच पिंजरे लावले. रखवालदारांचा बंदोबस्त असतानाही मंत्र्यांच्या बंगल्यांच्या जवळ बिबटे येतात. नुकतेच एका शेतकऱ्याने बिबट्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तो ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरत असताना बिबट्या बराचवेळ तेथे फिरत होता. एकूणच बिबटे आता `मानसाळले` आहेत. मनुष्यापासून त्याला भिती वाटत नाही, हेच खरे.

बहुतेक मंत्र्यांचे अलिशान बंगले शेतात म्हणजे निवांत ठिकाणी आहेत. बिबट्या त्याच्या पद्धतीने ऊसात, डोंगरात दडत फिरत भक्षाच्या शोधात फिरत असतो. त्यामुळे मंत्र्यांचे बंगलेच बिबट्याच्या कार्यक्षेत्रात तयार झाले, असेच म्हणावे लागेल. बिबट्याचे भक्ष असलेले वन्य प्राणी माणसांनी मारले. हरिण तसेच इतर प्राण्यांची शिकार सर्रास होते. त्यामुळे बिबट्याला भक्षाच्या शोधार्थ भटकावे लागते. त्यातच तो मनुष्यवस्तीकडे झेपावतो व लोकांना त्याचे दर्शन होते. त्यामुळे मनुष्यानेच बिबट्याच्या कार्यक्षेत्रात वस्त्या करताना विचार करावा लागेल. महाराष्ट्रात अशा अनेक वस्त्या बिबट्याच्या कार्यक्षेत्रात आहेत, हे नाकारता येणार नाही.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख