विखेंनी रेमडिसिव्हीर इंजेक्शन किती आणली? 10 हजार? न्यायालयासमोर आला आकडा..... - how many remidisiver virals brought by MP Sujay vikhe court asks the question | Politics Marathi News - Sarkarnama

विखेंनी रेमडिसिव्हीर इंजेक्शन किती आणली? 10 हजार? न्यायालयासमोर आला आकडा.....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 6 मे 2021

पोलिसांकडे जाण्याचा तक्रारदांना उच्च न्यायालयाचा आदेश 

पुणे : भाजपचे खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांनी नगर जिल्ह्यासाठी विमानाद्वारे रेमडिसिव्हिर इंजेक्शन्स (Remdisivier injection) आणल्याचा धुरळा अजून खाली बसायला तयार नाही. या इंजेक्शनचा तुटवडा असताना फक्त त्यांनाच ती कशी काय मिळाली आणि हा साठेबाजीचा प्रयत्न असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात याचिकाही (PIL against Sujay Vikhe) दाखल झाली. पण विखे यांनी नक्की किती इंजेक्शन्स आणली होती, याची माहिती उघड होत नव्हती आणि त्यांनी पण ते जाहीर केले नव्हते. त्यांनी दहा हजार इंजेक्शन आणल्याचा दावा करण्यात आला होता. ही इंजेक्शन आणतानाचा व्हिडीओ विखेंनी सोशल मिडियात जाणीवपूर्वक अपलोड केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench of Mumbai High Court) याबाबत याचिका दाखल झाली होती आणि विखेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि बी. यू. देबडवार यांच्यासमोर या ही सुनावणी झाली. विखेंच्या या इंजेक्शनवारीने नगर जिल्ह्यात चर्चा सुरू झाल्या आणि देशात तुटवडा असताना त्यांना एकट्यालच एवढी इंजेक्शन कशी मिळाली, यावर संशय व्यक्त करण्यात आला. विखे यांनी याबाबतच्या व्हिडीओतच आपण माणुसकी धर्म म्हणून हे काम करत असल्याचा दावा करत माझ्याविरुद्ध तक्रारी होतील याची मला जाणीव असल्याचे म्हटले होते. 

हे सारे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर विखेंनी आणलेल्या इंजेक्शनचा आकडा एका रिपोर्टमध्ये पुढे आला. विखेंनी 1700 इंजेक्शन आणल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी सिव्हिल सर्जनने आॅर्डर केल्याचे त्यात म्हटले आहे. त्याचे पैसे विखेंनी दिले. 

ही पण बातमी वाचा : सीबीआयचा ठाकरे सरकार अस्थिर करण्याचा डाव

साठेबाजी केल्याचा मुद्दा उपस्थित करत आणि ही इंजेक्शन नगरमधील खरेच गरजू रुग्णांना दिली आहेत का, असा प्रश्न विचारत विखेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती. तसेच याचा तपास राहुरी पोलिस सोडून इतर अधिकाऱ्यांकडे किंवा सीआयडीकडे देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली नाही. तसेच याचिकाकर्त्यांना पुन्हा पोलिसांकडे तक्रार घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला तर तुम्ही न्यायालयात या, असे याचिकाकर्त्यांना सांगण्यात आले. पोलिस व्यवस्थित तपास करणार नसल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आल्यानंतर न्यायालयाने असे कोणी केले तर त्याला नोकरी गमवावी लागेल, असे युक्तिवादाच्या वेळी सांगितले.

विखे यांनी आॅर्डरप्रमाणे 1700 इंजेक्शन आणली आणि तेवढीच रक्कम दिली का की त्यापेक्षा जास्त रक्कम देऊन दहा हजार इंजेक्शन्स आणली का, याचा तपास पोलिसांना करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.  विखे यांनी या याचिकेला उत्तर देण्यासाठी सहभागी करून घेण्याची परवानगी मागितली. मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख