`दानवे हे चकवा देणारे, पण फडणवीस आणि विखेंमुळे निवडून आणले - Danve is a chakwa, but elected because of Fadnavis and Vikhen | Politics Marathi News - Sarkarnama

`दानवे हे चकवा देणारे, पण फडणवीस आणि विखेंमुळे निवडून आणले

गाैरव साळुंके
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

दानवे हा माणूस चकवा देणारा माणूस आहे. ते शब्दाला टिकणार नाही, डोक्यावर हात ठेवून ते दानव बनतील, असे मी त्यावेळी सांगितले होते. परंतू विखे आणि फडणवीसांमुळे आपण केंद्रीय मंत्री दानवे यांचा विजय खेचून आणला.

श्रीरामपूर : येथील एका कार्यक्रमात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांना आपल्या डोक्यावरील टोपी कायम ठेवण्याचा सल्ला दिला. राजकारणात टोपीला पुर्वीपासून विशेष महत्व असून, आजच्या राजकारणात टोपी घालणारे नेतेमंडळी दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे आपल्या टोपीची विशेष काळजी घेण्याचे माजी आमदार मुरकुटे यांनी राज्यमंत्री सत्तार यांना सांगितले. त्यावर ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या टोपीचे रहस्य उलगडले.

आपल्या राजकारणात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभवाचा पावित्रा घेत टोपी डोक्यावर चढविली. आणि केंद्रीय मंत्री दानवे यांचा प्रराभव केल्याशिवाय डोक्यावरील टोपी काढणार नाही, असे ठरविले. परंतू पुढे परिस्थिती बदलली आणि आपला शिवसेनेत प्रवेश झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्यावर केंद्रीय मंत्री दानवे यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपविली. त्यावेळी दानवे हा माणूस चकवा देणारा माणूस आहे. ते शब्दाला टिकणार नाही, डोक्यावर हात ठेवून ते दानव बनतील, असे मी त्यावेळी सांगितले होते. परंतू विखे आणि फडणवीसांमुळे आपण केंद्रीय मंत्री दानवे यांचा विजय खेचून आणला परंतू टोपी मात्र डोक्यावर कायम राहिली. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये टोपीला विशेष महत्व असल्याचे ग्रामविकासमंत्री सत्तार यांनी सांगितले.

माजी आमदार मुरकुटे यांनी राजकारणातील टोपीच्या जुन्या आठवणींना उजाळा देतांना म्हणाले, की आपला तत्कालिन शिवसेनेत प्रवेश झाला. त्यावेळी माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये पक्षांतर केले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मामा मला शिवसेना प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले. एक टोपी गेली, आणि दुसरी आली, अशा मिश्किल शैलीत टिप्पणी करीत ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा फोटो काढण्याचे सांगितले. या टोपीने ती टोपी उलटली पाहिजे, असे ठाकरे शैलीत सांगितले.

विधानसभेत आता टोपी घातलेल्या मंत्र्यांची संख्या कमी झाली आहे. शंकरराव कोल्हे, शिवाजी कर्डिले यांच्यासारखे पाच-सहा आमदारच टोपीवाले दिसायचे, असे माजी आमदार मुरकुटे म्हणाले.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख