`भाजयुमो`ची तिनही पदे नेतेपुत्रांना गेले, कार्यकर्ते मात्र सतरंज्या उचलून `मेले` - All the three posts of BJP went to the sons of the leaders, but the activists picked up the satranjyas and died. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

`भाजयुमो`ची तिनही पदे नेतेपुत्रांना गेले, कार्यकर्ते मात्र सतरंज्या उचलून `मेले`

मुरलीधर कराळे
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

`भाजयुमो`ची दक्षिण नगर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करताना राहुरी तालुक्याचे पारडे जड झाले आहे. महत्त्वाचे तीनही पदे एकाच मतदारसंघात देण्यात आली आहेत.

नगर ः भारतीय जनता युवा मोर्चाची नगर दक्षिण कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली. त्यामध्ये तीनही महत्त्वाची पदे तीन महत्त्वाच्या नेत्यांच्या पुत्रांना देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात युवकांना प्राधान्य देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार भाजपचे विधानसभेचे चेहरे म्हणून हेच पदाधिकारी असतील, हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ओळखून घेतले.

ज्येष्ठ नेते चंद्रशेखर कदम यांचे पूत्र देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांना `भाजयुमो`च्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना सरचिटणीस, तर माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचे चिरंजीव विवेक बेरड यांना खजिनदार हे पद देण्यात आले. म्हणजे तीनही महत्त्वाची पदे महत्त्वाच्या नेत्यांकडे देण्यात आले. इतर कार्यकर्ते मात्र सतरंज्या उचलूनच मेले, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

राहुरी मतदार संघावरच फोकस

`भाजयुमो`ची दक्षिण नगर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करताना राहुरी तालुक्याचे पारडे जड झाले आहे. महत्त्वाचे तीनही पदे एकाच मतदारसंघात देण्यात आली आहेत. देवळाली प्रवराचे सत्यजीत कदम, बुऱ्हाणनगरचे अक्षय कर्डिले व दरेवाडीचे विवेक बेरड हे एकाच म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे एकाच मतदारसंघात तीनही पदे देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपच्या दृष्टीने हा मतदारसंघ अधिक बळकट करण्याचे कोणाचे धोरण आहे, याचीच चर्चा राजकीय धुरिणांमधून होत आहे.

जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी कार्यकारिणी जाहीर करताना सर्व नेत्यांना विश्वासात घेतले असल्याचे म्हटले आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे व शिवाजी कर्डिले, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड आदींच्या सुचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली ही युवा मोर्चाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र राहुरी मतदारसंघाचेच वर्चस्व या कार्यकारिणीवर राहिले आहे.

इतर कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार

भाजपने युवकांच्या संघटनेचे पदे जाहीर करताना राजकीय घराण्यालाच प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र उपेक्षित राहिले असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांतून होत आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी हीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती, मात्र तिला स्थगिती देऊन पुन्हा तिच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नियमबाह्य कार्यकारिणी असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे होते, तर त्या वेळी भाजपमध्ये सुसंवाद नव्हता काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख