निघोजमधील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे खेड घाटातून अपहरण - Two Gram Panchayat members abducted from Khed Ghat in Nighoj | Politics Marathi News - Sarkarnama

निघोजमधील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे खेड घाटातून अपहरण

राजेंद्र सांडभोर
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

पारनेर तालुक्यातील निघोज ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे, ते सहलीवर असताना खेड घाटाजवळील एका हॉटेलमधून १५ ते २० जणांच्या टोळक्याने मारहाण करीत अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

राजगुरुनगर : नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे, ते सहलीवर असताना खेड घाटाजवळील एका हॉटेलमधून १५ ते २० जणांच्या टोळक्याने मारहाण करीत अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

पारनेर तालुक्यातील निघोज गावात सरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच आहे. एका गटाचे ९ तर दुसर्‍या गटाचे ८ सदस्य निवडून आले आहेत. एका गटाचे सदस्य देवदर्शनासाठी सहलीवर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोज येथील भरत लाला रसाळ, योगेश आनंदा वाव्हळ, शंकर गबाजी गुंड, दिगंबर भागाजी लाळगे, गणेश दत्तू कवाद, हे सर्व नवनिर्वाचित सदस्य सहलीवर होते. त्यांच्याबरोबर शंकर कृष्णा वरखडे, सतीश पोपट साळवे, नितीन नारायण पांढरकर आणि पॅनेल प्रमुख ठकाराम बाळू लंके, शिवाजी गबाजी गुंड, सुनिल किसन शेटे व इतरही काही जण सहलीवर होते.

पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटाजवळील सूर्यकांत खानावळ येथे ते जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी सचिन मच्छिंद्र वराळ, मंगेश सखाराम वराळ, सुनील मच्छिंद्र वराळ, निलेश राजू घोडे, अजय संजय वराळ, राहुल भाऊसाहेब वराळ, स्वप्नील भाऊसाहेब दुनगुले, सुभाष आनंदा वराळ, आकाश विजय वराळ, धोंडीभाऊ जाधव व इतर पंधरा ते वीस जण त्याठिकाणी आले. त्यांच्यातील सुनील वराळ व अन्य तिघांनी फिर्यादी विठ्ठल भाऊसाहेब कवाद यांना लाकडी काठीने मारहाण केली.

स्वप्नील दुनगुले व सचिन वराळ यांनी हातात तलवार घेऊन तलवारीचा धाक दाखवला. तसेच सुभाष वराळ याने त्याच्या हातात लोखंडी रॉड घेऊन, उपस्थितांना शिवीगाळ व दमदाटी करून, दिगंबर लाळगे यांना उचलून पांढऱ्या रंगाच्या इनोवा गाडीत बळजबरीने घालून नेले. 

तसेच निलेश घोडे, अजय वराळ, धोंडीभाऊ जाधव व राहुल वराळ यांनी लाठीकाठी तलवार लोखंडी रॉड हातात घेऊन, शिवीगाळ दमदाटी करून गणेश दत्तू कवाद यांना बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीमध्ये घालून त्यांचे अपहरण केले. तसेच सतीश पोपट साळवे यांच्या हातातील मोबाईल धोंडीभाऊ जाधव याने घेऊन जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले.

या प्रकरणी या दहा जणांवर आणि त्यांच्या बरोबरच्या १५ ते २० जणांवर, खेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा, मारहाणीचा, बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले अधिक तपास करीत आहेत.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख