कोरोनाचा कहर ! राजधानी दिल्ली मिनी लाॅकडाऊनच्या दिशेने ?

दिल्लीत कोरोनाचे जोरदार वाहक बनलेल्या बाजारपेठा व अन्य गर्दीच्या ठिकाणांच्या आसपासच्या हाॅटस्पाॅटमध्ये पुन्हा कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार करण्याची शिफारस राज्याने केली आहे.
arvind kejriwaal.png
arvind kejriwaal.png

नवी दिल्ली : कोरोना महामारीची तिसरी लाट आल्याचे सांगितले जाणारी राष्ट्रीय राजधानी दिल्ली व परिसरात पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर व छोट्या प्रमाणावर लाॅकडाऊन लावण्याचा प्रस्ताव दिल्ली सरकारने केंद्राकडे पाठविला आहे.

दिल्लीत कोरोनाचे जोरदार वाहक बनलेल्या बाजारपेठा व अन्य गर्दीच्या ठिकाणांच्या आसपासच्या हाॅटस्पाॅटमध्ये पुन्हा कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार करण्याची शिफारस राज्याने केली आहे.

लग्न समारंभांत 200 ऐवजी फक्त 50 लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी द्यावी, असाही प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिली.

दरम्यान, कोरोनाच्या कारनावरून छटपूजेवर बंदी आणणाऱ्या केजरीवाल सरकारने ईदच्या वेळी बाजारपेठांत खच्चून गर्दी करण्यास मुक्तद्वार का दिले होते, असा सवाल दिल्ली भाजपने विचारला आहे.

दिल्लीत दैनंदिन कोरोना रूग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. एकूण 4 लाख 89 हजार 202 पैकी 40 हजार 128 सक्रिय कोरोनाग्रस्त राजधानीत आहेत. दर 24 तासांतील नवी रूग्णसंख्या 7 व कधी तर 8 हजारांच्या पुढे जाण्याचा भयावह कल पुन्हा सुरू झाला आहे. कोरोनाची दहशत व नागरिकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याने केजरीवाल सरकारने कठोर भूमिका घेण्याचा विचार चालविला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील कोरोना निर्मूलन परिस्थितीत पुन्हा थेट हस्तक्षेप केला आहे. मात्र दिवाळीनंतर पुन्हा रूग्णसंख्या वाढू लागली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज सांगितले, की स्थानिक पातळीवर अधिकाधिक नवे रूग्ण आढळणारे भाग सीलबंद करावेत, यासाठी स्थानिक पातळीवर पुन्हा लाॅकडाऊन करण्याचा प्रस्ताव केंद्राला आम्ही पाठवला आहे. दिल्लीत लागू झालेल्या कंटेनमेंट झोनच्याही पुढची पायरी म्हणजे प्रस्तावित मिनी लाॅकडाऊन असेल. याबाबत राज्याने केंद्राला प्रस्ताव पाठविला आहे. दिल्लीत कोरोनाचा वाढलेला कहर नियंत्रित करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार व सर्व यंत्रणा दु्प्पट मेहेनत घेत आहेत. निमलष्करी दलांचे 75 डाॅक्टर व 250 वैद्यकीय सहाय्यकही दिल्लीत पाठविण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे नाव घएत नसल्याने केंद्राचीही काळजी वाढली आहे.

दिल्ली भाजप आक्रमक

यंदा 18 ते 21 नोव्हेंबर दरम्यान छटपर्व साजरे केले जाणार आहे. छटपूजेनिमित्त यमुनेच्या काठांवर एकच गर्दी होते. कोरोना काळात स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी यंदा छट पूजेवर केजरीवाल सरकारने बंदी घातली आहे. त्याच्या निषेधार्थ दिल्ली भाजपने आज मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर उग्र प्रदर्शने केली. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांनी उभारलेले अडथळएही तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील पूर्वांचल भाजप शाखेच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दिल्ली सरकारने यंदा सामूहीक छट पूजेवर बंदी घातली आहे.

भाजप प्रवक्ते नवीन कुमार म्हणाले, की केजरीवाल सरकार सारी कामे करण्यास सक्षम आहे, असे म्हणते तर फक्त छटपूजा, दिवाळी याच वेळी नागरिकांवर वेगवेगळी बंधने का लादली जातात. कोरोना रूग्ण वाढत असताना ईदच्या दिवशी विविध बाजारात गर्दी करण्यास मुक्त सूट का दिली गेली. हा भेदभाव भाजपला अमान्य असून, आमचे आंदोलन चालूच राहील.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com