प्रदेश काॅंग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत पुण्याला दोन उपाध्यक्ष! - Pune has two vice presidents in the jumbo executive of the Pradesh Congress | Politics Marathi News - Sarkarnama

प्रदेश काॅंग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत पुण्याला दोन उपाध्यक्ष!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

माजी आमदार मोहन जोशी व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबरोबरच माजी आमदार अनंत गाडगीळ यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसची कार्यकारिणी आज जाहीर झाली. त्यामध्ये अध्यक्षपदी विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची निवड झाली. नव्या कार्यकारिणीत सहा कार्याध्यक्ष, तर दहा उपाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. त्यापैकी पुण्याला दोन उपाध्यक्ष मिळले आहेत.

पुण्याचे काॅंग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. याबरोबरच माजी आमदार अनंत गाडगीळ, शरद रणपिसे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे. मोहन जोशी यांना निमंत्रक म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे पुण्यातून काॅंग्रेसचे हेच चेहरे पक्षश्रेष्ठींसमोर आहेत, हेच आजच्या नियुक्त्यांवरून दिसून आले.  

पिंपरी-चिंचवडचे माजी पालिका आयुक्त भा. ई. नगराळे यांना देखील उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून मात्र प्रदेश कार्यकारिणीवर कोणालाच नियुक्ती मिळाली नाही. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीमंडळात किंवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पद मिळणार असल्याची चर्चा असल्याने त्यांना संघटनेत घेतले नसावा, असा तर्क लढविण्यात येत आहे. बागवे हे पुण्याचे शहराध्यक्ष देखील आहेत. त्यांना उपाध्यक्ष म्हणून बढती मिळाल्याने त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्ष नेमला जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. रायगडचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांनाही उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. दोघांनाही एकच न्याय लावावा लागेल. त्यामुळे बागवे हेच पदावर कायम राहतील, असा त्यांच्या समर्थकांचा सूर आहे.

मोहन जोशी हे बाळासाहेब थोरात यांच्या कोट्यातून तर बागवे हे अशोक चव्हाण यांच्या गटातर्फे प्रदेशवर गेल्याचे सांगण्यात आले. गाडगीळ हे थेट कोणत्याही गटात नसले तरी त्यांची आठवण पक्षश्रेष्ठींनी ठेवल्याचे दिसून येते. ते प्रवक्ते म्हणून चांगले काम करत होते. मात्र सचिव सावंत व त्यांचे फारसे जमत नसल्याने गाडगीळ पक्षाची बाजू मांडण्यासाठी फारसे जात नव्हते. आता नवीन प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर त्यांना प्रवक्तेपदी परत संधी मिळणार का, हे पाहावे लागेल. 

विभागानुसार एक कार्याध्यक्ष घेण्यात आला आहे. त्यातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे (विदर्भ), बसवराज पाटील (मराठवाडा), मोहंमद खान, कुणाल पाटील (उत्तर महाराष्ट्र) चंद्रकांत हंडोरे (मुंबई) आणि प्रणिती शिंदे (पश्चिम महाराष्ट्र) अशी नियुक्ती झाली आहे.  

उपाध्यक्ष - शिरीश चाैधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलास गोरंट्याल, भा. ई. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख, माणिक जगताप.

कार्यकारिणी सदस्य - नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवराज पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी. पाडवी, विजय वडेट्टिवार, डाॅ. नितीन राऊत, वर्षा गायकवाड, सुनील केदार, अस्लम शेख, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, सुरेश धानोरकर, रणजित कांबळे, सुरेश शेट्टी, हुसैन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्दकी, अशिष देशमुख, भालचंद्र मुणगेकर, मुशरफ हुशेन, मनोज जोशी
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख