राज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली

कोणताही खासगी व्यक्ती जिल्हा परिषदेत राजरोसपणे खासगी कार्यालय कसे काय थाटू शकतो, असा सवाल उपस्थित झाला आहे.
pune zp.jpg
pune zp.jpg

पुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस आला. या सचिवाने या खोलीच्या प्रवेशद्वारावर संबंधित मंत्र्यांच्या पदाचा आणि स्वतःच्या नावाचा ठळक उल्लेख असलेला फलकही लावला.

हा प्रकार विरोधकांच्या लक्षात येताच, त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवाय प्रवेशद्वारावरील नावाचा उल्लेख स्पष्ट दिसत असलेली छायाचित्रेही काढली. या अनपेक्षित प्रकाराने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.

यानिमित्ताने कोणताही खासगी व्यक्ती जिल्हा परिषदेत राजरोसपणे खासगी कार्यालय कसे काय थाटू शकतो, असा सवाल उपस्थित झाला आहे. विरोधकांचा आक्षेप आणि प्रशासन अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच, बुधवारी सायंकाळी उशिरा तातडीने हा फलक हटविण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत रितसर ठराव करण्यात आलेला नाही. झेडपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसा लेखी आदेशही नाही. मग कार्यालय कशाच्या आधारे थाटल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर ही खोली आहे. ही खोली प्रत्यक्षात आरोग्य पतपेढीसाठी आरक्षित आहे.कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून येथे आरोग्य पतपेढी आणि नियंत्रण कक्षाचे काम सुरू करण्यात आले होते. सुरवातीला संबंधित मंत्र्यांचा खासगी सचिव येथे बसून कामकाज करत असे. पुढे येथून आरोग्य पतपेढी अन्यत्र हलवून दारावर चक्क संबंधित मंत्र्यांच्या पदाचा आणि स्वतःच्या पदाचा नावासह उल्लेख असलेला फलक लावल्याचे निदर्शनास आले. झेडपीच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंत्र्याला खूष करण्यासाठी ही खोली तोंडी आदेशाद्वारे दिली होती. मात्र हे प्रकरण अंगलट येत असल्याचे निदर्शनास येताच, हा फलक काढून टाकण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात करण्यात येत आहे.

दरम्यान, एका जिल्हा परिषद सदस्याने याबाबत तक्रार केल्यानंतर, तातडीने संबंधित खोलीची पाहणी करण्यासाठी कर्मचारी पाठवला. मात्र तेथे खासगी व्यक्तीच्या नावाचा फलक आढळून आला नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com