राजकीय पंढरी गोविंदबागेतील पाडवा पहिल्यांदा गर्दिविना - Padwa in the political Pandhari Govindbag for the first time without crowd | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

राजकीय पंढरी गोविंदबागेतील पाडवा पहिल्यांदा गर्दिविना

कल्याण पाचांगणे
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

कोरोनाच्या महामारीमुळे पुर्णतः मर्य़ादा आल्या. अनेक वर्षाची परंपरा खंडीत झाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी मोबाईद्वारे संपर्क करीत संबंधित नेत्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

माळेगाव : साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त म्हणजे दिवाळी पाडवा. या पवित्र सणाच्या निमित्ताने थोरामोठ्यांबरोबर आपल्या नेत्याचे आशिर्वाद घेवून वर्षाची सुरवात उत्साहाने करणे, ही परंपरा खरेतर बारामतीकरांची. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपापल्या घरीच थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेवून पाडव्याचा आनंद घ्यावा, अशी पवार कुटुंबियांनी अपुलकी आणि जिव्हाळ्याची विनंती आज बारामतीकरांसह राज्यातील लाखो लोकांनी मान्य केली.

पवार यांच्या विनंतीमुळेच बारामती-शारदानगर, गोविंदबाग परिसर सुनासुना वाटप होता. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनीसुद्धा लोकांना न भेटता कुटुंबाबरोबर दिवाळी पाडवा सण तितक्याच आनंदात साजरा केला.

वास्तविक पाडव्या दिवशी पवार यांच्या निवासस्थानी (बारामती - गोविंदबाग) मोठ्या स्नेह मेळाव्याची तयारी असते. या दिवशी बारामतीसह राज्यातील लाखो लोकांचा मेळा आपल्या नेत्याला भेटायचा आणि त्यांचे आशिर्वाद घेवून नवीन वर्षाची सुरवात करायचा. परंतु या उत्साहाला कोरोनाच्या महामारीमुळे पुर्णतः मर्य़ादा आल्या. अनेक वर्षाची परंपरा खंडीत झाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी मोबाईद्वारे संपर्क करीत संबंधित नेत्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. हे विशेष होय.

दरम्यान, शारदानगर-माळेगाव काॅलनी परिसरातील गोविंद बागेत यंदा पाडव्याचे सर्वाजनिक स्वरूप न दिसल्याने येथील गावकऱ्यांना सकाळपासून काहीतरी चुकल्यासारखे जाणवत होते. एम.एच. ४२, एम.एच. १२, एम.एम. १६ आशा विविध नंबरच्या पासिंग असलेल्या रंगीबेरंगी गाड्याच्या रांगांनी खरेतर नीरा-बारामती राज्यमार्ग तुंबड भरलेला असायचा. पोलिस बंदोबस्तात रस्ता मोकळा करण्याची वेळ येत होती. परंतु हे आशादायक चित्र स्थानिकांना सोमवारी पहावयास मिळाले नाही, याची खंत नितीन तावरे, रविंद्र थोरात, प्रकाश सावत, गोविंदराव ढवाण, रविंद्र काळे, किरणराज पवार, संतोष वळकुंदे, ज्येष्ठ नेते अशोकराव जाधव आदींनी बोलून दाखविली.

जधाव म्हणाले, की दिवाळी पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा येत असतो. हा दिवस वर्षभर मोठ्या उत्साहाने जगण्याची प्रेरणा देत असतो. खरेतर या पवित्र दिवशी थोरामोठ्यांबरोबर आपल्या नेत्यांचे आशिर्वाद मिळावेत म्हणून दिवाळी पाडव्याची वाट पाहत असतो. यंदा मात्र पडव्याचा उत्साह तेवढाच, पण पवार यांची, अजितदादांची भेट न होऊ शकल्याने मनाला वेदना होतात, हे मात्र नक्की.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख