आमदार सातपुते यांचा लग्नाचा पण फडणविसांनी पूर्ण केला - MLA Satpute's marriage was completed by Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सातपुते यांचा लग्नाचा पण फडणविसांनी पूर्ण केला

उमेश घोंगडे
रविवार, 20 डिसेंबर 2020

सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार आहेत. मोहिते-पाटील यांच्या या पारंपरिक मतदारसंघातून आरक्षणाच्या जागेवर आमदार सातपुते निवडून आले आहेत.

पुणे : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच लग्न करण्याचा पण माळशिरसचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांनी केला होता. गेले वर्षभर ते त्यासाठी थांबले होते. आज त्यांचा हा पण पूर्ण झाला. फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत तसेच राज्याच्या सर्व भागातील आमदार, खासदार व भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज हा सोहळा झाला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पुण्याचे खासदार गिरीश बापट, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार नितेश राणे, परिणय फुके, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, भिमराव तापकिर, प्रसाद लाड, माजी आमदार योगेश टिळेकर, पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पक्षाचे पुण्यातील तसेच राज्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार आहेत. मोहिते-पाटील यांच्या या पारंपरिक मतदारसंघातून आरक्षणाच्या जागेवर आमदार सातपुते निवडून आले आहेत. आजच्या विवाह समारंभाला आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या परिवारातील धैर्यशील मोहिते-पाटील व अर्जुनसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. गेल्या वर्षभरापासून त्यांचा विवाह लांबला होता. एप्रिल महिन्यात माळशिरस येथे सामुदाविक विवाह सोहळ्यात त्यांचे लग्न होणार होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्यात आल्याने हा विवाह पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे फडणवीस यांच्या वेळेच्या सोयीनुसार आज विवाह उरकण्यात आला.

आमदार सातपुते हे फडणवीस यांचे जवळचे कार्यकर्ते मानले जातात. विद्यार्थी परिषदेचा पुणे शहर मंत्री ते थेट आमदार हा त्यांचा प्रवास आहे. विद्यार्थी परिषदेचा आक्रमक कार्यकर्ता ही आमदार सातपुते यांची ओळख आहे. आजच्या विवाह समारंभाला परिषदेच्या तरूण कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख