पिंपरी चिंचवड महापालिका ! भाजपला निवडणुकीचे वेध, सादर करणार करवाढ नसलेलेले बजेट - Pimpri Municipal Corporation! BJP to watch elections, to present non-tax budget | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरी चिंचवड महापालिका ! भाजपला निवडणुकीचे वेध, सादर करणार करवाढ नसलेलेले बजेट

उत्तम कुटे
मंगळवार, 19 जानेवारी 2021

पालिकेचा २०२१-२२ अर्थसंकल्प तथा बजेट पुढील महिन्यात १७ तारखेला स्थायी समितीसमोर सादर होणार आहे.

पिंपरी : पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीचे वेध पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला आतापासूनच लागले आहे. त्याची तयारी म्हणून नुकतीच (ता.१६) त्यांनी शहरासाठी नवे प्रभारी नेमले.तर,आता पुन्हा पालिकेत सत्तेत येण्यासाठी त्यांनी येत्या आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) पालिका बजेटमध्ये कुठलीही करवाढ न करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कोरोनाने कंबरडे मोडलेल्या शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालिकेचा २०२१-२२ अर्थसंकल्प तथा बजेट पुढील महिन्यात १७ तारखेला स्थायी समितीसमोर सादर होणार आहे. त्यामुळे सध्या त्याची तयारी प्रशासनाकडून सुरु आहे. तसेही प्रशासनाला पुढील आर्थिक वर्षासाठीच्या करांचे दर २० फेब्रुवारीपर्यंत निश्चीत करावे लागतात. त्यामुळे २०१७ ला पालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने पुन्हा २०२२ ला सत्तेत येण्यासाठी कर नसलेले बजेट सादर करण्याचे ठरवले आहे. तसा म्हणजे पालिका बजेटमध्ये करवाढ न करता ती जैसे थे ठेवण्याचा विषय आज स्थायी समितीने मंजुर केला.आता तो पालिकेच्या या महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.

कोरोनाने या वर्षात पालिकेला अपेक्षित महसूल मिळालेला नाही. त्यामुळे ही कसर प्रशासन करवाढ करून भरून काढणार होते. मात्र, कोरोनाने अगोदरच त्रस्त झालेल्या जनतेवर करवाढ लादली,तर त्याचा फटका पालिका निवडणुकीत बसेल या शक्यतेतून भाजपने करवाढीला ब्रेक लावला. त्यामुळे मिळकत तथा मालमत्ताकर, पाणीपट्टी व इतर कर त्यांनी जैसे थे ठेवले आहे.

 

हेही वाचा..

भोकरच्या उपसरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव संमत 

श्रीरामपूर : तालुक्‍यातील भोकर येथील उपसरपंच राधाकिसन विधाटे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय आहेर यांच्यासह अन्य 12 सदस्यांच्या मतदानाने संमत झाला. 

भोकर ग्रामपंचायत मुरकुटे गटाच्या ताब्यात असून, लोकनियुक्त सरपंचासह गटात 11, तर विरोधी ससाणे गटाकडे चार सदस्य आहेत. काही महिन्यांपूर्वी सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीदरम्यान मुरकुटे-ससाणे गटांत समझोता झाला होता. 

उपसरपंच राधाकिसन विधाटे यांच्याविरोधातील अविश्‍वास ठरावासाठीही दोन्ही गट एकत्र आल्याचे समोर आले. अविश्‍वास प्रस्तावावर ससाणे गटाच्या चार सदस्यांसह मुरकुटे गटाच्या नऊ सदस्यांच्या सह्या आहेत. 

ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार पाटील यांनी आज घेतलेल्या बैठकीत, उपसरपंच अधिकाराचा दुरुपयोग करतात, कर्तव्य जबाबदारीने पार पाडत नसल्याची तक्रार सदस्य महेश पटारे यांनी केली. याबाबत मांडलेला अविश्‍वास ठराव उपस्थित सदस्यांनी हात वर करून दोनतृतीयांश बहुमताने संमत केला. 

या वेळी तहसीलदार पाटील, लिपिक नीलेश सोनटक्के, तलाठी ज्ञानेश्‍वर हाडोळे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, पोलिस पाटील बाबासाहेब साळवे उपस्थित होते. बैठकीला सरपंच दत्तात्रय आहेर यांच्यासह सदस्य रुक्‍मिणी खंडागळे, स्वाती चव्हाण, इंदू आहेर, राजेंद्र चौधरी, प्रसाद ओहोळ, मीनाक्षी चव्हाण, महेश पटारे, जयश्री छल्लारे, लता अमोलिक, सागर शिंदे, सुभाष डुक्रे व सविता गायकवाड आदी उपस्थित होते. उपसरपंच राधाकिसन विधाटे, इंदूबाई रूपटक्के व किशोर आहेर अनुपस्थित होते. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख