माजी उपमहापौर मुलचंदांनीविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा
amar mulchandani

माजी उपमहापौर मुलचंदांनीविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा

पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर आणि सेवा विकास बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानींविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात काल दाखल झाला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर आणि सेवा विकास बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानींविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात काल दाखल झाला. या पोलिस ठाण्यावरील त्यांच्याविरुद्धचा हा पाचवा गुन्हा आहे. तर, शहरात चार पोलिस ठाण्यांवर त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत असे आठ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील निम्मे म्हणजे चार गुन्हे गेल्या अडीच महिन्यातील आहेत.

दरम्यान, पिंपरी पोलिस ठाण्यावरील १९ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या मुलचंदानींच्या पोलिस कोठडीत १५ तारखेपर्यंत न्यायालयाने काल वाढ केली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. त्यात मुंबईतून अटक करण्यात आलेले मुलचंदांनी ९ तारखेला न्यायालयाने कालपर्यंत (ता. १२) पोलिस कोठडी दिली होती. म्हणून त्यांना काल पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्या पोलिस कोठडीत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली.

आता मुलचंदांविरुद्धच्या गुन्ह्याच्या तपासासाठी शहर पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.दुसरीकडे त्यांच्याविरुद्ध  गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरु होताच त्यांच्या कार्यालयात उठबस असलेल्या स्थानिक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे.

२०१७ मधील घटनेप्रकरणी कालचा सव्वा कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यात बॅंक संचालकांच्या जो़डीने अधिकारी,कर्ज जामीनदार असे २८ संशयित आरोपी आहेत.त्यातील फिर्यादी पुण्यातील ज्येष्ठ महिला आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचे बनावट पॅनकार्ड आरोपींनी बनवले.त्याआधारे हवेली उपनिबंधक कार्यालय क्र.१८ मध्ये बनावट महिला उभी करून दस्त नोंदविण्यात आला.

या महिलेची पुण्यातील प्रॉपर्टी बॅंकेकडे गहाण ठेवली गेली. त्यानंतर सदर बनावट महिलेने फिर्यादी महिलेच्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करीन,असे धमकावत त्यांच्या सव्वा कोटी रुपयाच्या कर्ज अर्जावर सह्या घेतल्या. म्हणजे पत्नीच्या प्रॉपर्टी बॅंककेडे गहाण ठेवून त्यावर पतीने कर्ज काढल्याचे भासवण्यात आले. प्रत्यक्षात आरोपींनी हे सव्वा कोटी रुपये आपल्या बॅंक खात्यात वर्ग करून घेतले. त्यातील २५ लाख काढून त्याची वाटणीही केली होती,असा आरोप आहे.

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in