पिंपरी कोर्टाचे भाडे कमी करण्यास अजितदादांनी सांगितले - Ajit Pawar asked to reduce the rent of Pimpri Court | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरी कोर्टाचे भाडे कमी करण्यास अजितदादांनी सांगितले

उत्तम कुटे
गुरुवार, 14 जानेवारी 2021

पिंपरी कोर्टासाठी नाममात्र भाडे आकारण्याच्या विषयाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आज मंजुरी दिली.त्यामुळे कोर्ट स्थलांतराचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पिंपरी : पिंपरी कोर्टासाठी नाममात्र भाडे आकारण्याच्या विषयाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आज मंजुरी दिली.त्यामुळे कोर्ट स्थलांतराचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची आठ दिवसांपूर्वी पिंपरी बारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली तेव्हा त्यांनी भाडे कमी करण्यास पालिका आय़ुक्तांना सांगितले होते. त्यानंतर लगेचच भाजप सत्ताधारी पिंपरी पालिकेने आज ते नाममात्र केले.त्यामुळे १३ लाख तीन हजार २२९ रुपये महिना भाड्याची ही जागा कोर्टासाठी फक्त एक हजार रुपयांत भाड्याने मिळण्याची शक्यता  आहे.

पिंपरी कोर्टासाठी नेहरूनगर येथील जागा नाममात्र भाड्याने देण्याचा ऐनवेळचा विषय म्हणून मंजूर करण्यात आला. शहराचे कारभारी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे समर्थक सदस्य अभिषेक बारणे यांनी हा प्रस्ताव स्थायीत मांडला.भाऊंचेच दुसरे समर्थक शशिकांत कदम यांनी त्याला अनुमोदन दिले. तर,शहराचे दुसरे कारभारी भाजपचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे समर्थक संतोष लोंढे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.शहरातील तिसरे आमदार राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनीही कोर्ट स्थलांतरासाठी पाठपुरावा केला होता.

सध्याचे पिंपरी कोर्ट हे १९८९ ला सुरु झाल्यापासून भाड्यानेच मोरवाडी येथे पालिकेच्याच जागेत आहे. मात्र, अपघातग्रस्त चौकातील ही जागा ३१ वर्षानंतर खूप अपुरी पडू लागली आहे. तसेच कोर्टाची ही जुनी इमारत मो़डकळीस आली आहे. त्यात तेथे मुलभूत सुविधांचीही वानवा असल्याने कोर्ट नवीन प्रशस्त जागेत हलविण्याची मागणी वकिलांनी केली होती. त्यानुसार नेहरूनगर येथील जागा देण्यात आली.मात्र, त्यासाठी पालिकेने १३ लाख तीन हजार २२९ रुपये महिना भाडे मागितले.मात्र, कोरोनामुळे कुठल्याच नवीन खर्चावर राज्य सरकारने निर्बंध टाकल्याने पिंपरी बारचे स्थलांतर तूर्त अडले होते. तरीही बारच्या शिष्टमंडळाचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांनी गेल्या महिन्यात पिंपरीत,तर या महिन्याच्या चार तारखेला मुंबईत अजितदादांची भेट घेतली. त्यावेळी दादांनी आयुक्तांना भाडे कमी करण्यास सांगितले होते. ते आज स्थायीने कमी केले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख