इंदिरानगर (नाशक) : नाशिकरोड - देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांची महाराष्ट्र विधान मंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पाथर्डी फाटा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.
अध्यक्षपदाला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुतळ्यास आमदार आहिरे यांनी पुष्पहार अर्पण केला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडी सरकारचा विजय असो 'जाणता राजा पवार साहेब झिंदाबाद ', 'अजितदादा झिंदाबाद', 'भुजबळ साहेब यांचा विजय असो' आदी घोषणांनी परिसर दणाणला होता.
मिठाईचे वाटप करण्यात आले. महिला आणि बालकांसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भरीव काम करण्याचा मानस आमदार आहिरे यांनी व्यक्त केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकरोड देवळाली मतदारसंघाचे अध्यक्ष सोमनाथ बोराडे, विक्रम कोठुळे, संपत पाळदे, समाधान शिंदे, अंकुश भोर, मदन डेमसे, शुभम कर्डीले, महिंद्र कासार, सुनिल भाबड, किरण भुसारे, योगेश वनारे, सुधाकर आहोळ, अमोल डेमसे, संदिप जाधव, मंगेश धोंगडे आदींसह पाथर्डी,पिंपळगाव खांब, दाढेगाव,विहितगाव, देवळाली, नाशिकरोड भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्र विधान मंडळाचे महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण या समितीचे कार्य महत्त्वपूर्ण असते. त्या मंडळाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने राज्यात महिला व बालकांसाठी अनेक कामे करता येतात. विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देणे शक्य असते. नाशिकरोड - देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने या परिसराला मोठा बहुमान मिळाला आहे. शरद पवार, अजितदादा, भुजबळ आदींच्या सहकार्यामुळेच आहिरे यांना ही संधी मिळाल्याने या मतदारसंघातील नागरिकांमधून उत्सहाचे वातावरण आहे.
या पदाला राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो. त्यामुळे या भागाला मंत्रीपदाची संधी मिळाल्याने या भागाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया मतदारसंघातून व्यक्त होत आहे.

