येवला (नाशिक) : कुठलेही मुद्दे हाती घेऊन राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणे योग्य नसून देशात भाजपचे राज्यकर्ते म्हणून राहणार का? इतरांना राज्यकर्ते म्हणून राहण्याचा अधिकार नाही का? असा संतप्त सवाल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
येवला दौऱ्यावर असताना भाजपच्या धार्मिक आघाडीकडून राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या वेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गर्दीचे नियंत्रण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आज मुंबईसह इतर मोठ्या शहरात अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, त्यामुळे याठिकाणी गर्दी नियंत्रण करण्याबाबत राज्य सरकार नियोजन करत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर मंदिरे सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पूर्व पदावर आणण्यासाठी शासन सकारात्मक असून, मंदिर प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.
या वेळी ते म्हणाले की, सध्या कुठलेही मुद्दे हाताशी घेऊन राज्य शासनाला अडचणीत आणण्याचे कारस्थान केले जात आहे. केवळ राजकारणासाठी चाललंय, अशी टीका त्यानी केली.
ते म्हणाले की, आमच्या प्रत्येक बहुजन समाजातील कुटुंबात दररोज देवपूजा केली जाते. त्यानंतरच ते घराबाहेर पडत असतात. मात्र कुठलाही मुद्दा हाताशी घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे हे योग्य नाही. हे नेमक कुठलं हिंदुत्व म्हणताय, एकीकडे गोमाता म्हणायचे आणि गोव्यात मात्र गोमांस सेवन करायचे, अशी टीका छगन भुजबळ यांनी या वेळी केली.
दरम्यान, मंदिर प्रश्नाबाबत महाराष्ट्रात विशेष चर्चा होत आहे. आज भुजबळ यांनी केलेले वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. दिवाळीनंतर मंदिरे खुले होणार, असेच त्यांचे म्हणणे आहे.
Edited By - Murlidhar Karale

