मृदंगाचार्य शेळकेच्या जाण्याने इंदुरीकर महाराज ढसाढसा रडले! - Indurikar Maharaj burst into tears after the departure of Mridangacharya Shelke! | Politics Marathi News - Sarkarnama

मृदंगाचार्य शेळकेच्या जाण्याने इंदुरीकर महाराज ढसाढसा रडले!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 जानेवारी 2021

आपल्या मृदंग वादनाने राज्यभर लोकप्रिय झालेल्या तालुक्यातील ठाणगाव येथील प्रसिद्ध मृदंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके (वय ३०) यांचे अल्प आजाराने निधन झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 येवला (जि. नाशिक) : माणूस भावनाशील असतो, त्यातच जिव्हाळ्याचा आणि आपुलकी निर्माण झालेला सहकारीच अचानक आपल्यातून निघून गेला, तर आपण नक्कीच निशब्द होतो. याचा प्रत्यय येवला तालुक्यातील ठाणगाव येथे आला. या प्रसंगी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर इतके भावनाविवश झाले, की इतरांच्या गळ्यात पडून ते हमसून रडले. या दुःखद प्रसंगाचा व्हिडिओ राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सहकारी मृदंगाचार्याच्या आठवणीत इंदुरीकर महाराज हळहळले! 

महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तन कार्यक्रमात आपल्या मृदंग वादनाने राज्यभर लोकप्रिय झालेल्या तालुक्यातील ठाणगाव येथील प्रसिद्ध मृदंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके (वय ३०) यांचे अल्प आजाराने निधन झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अनेक वर्षे सोबत राहून मृदंगाची साथ देणारा तरुण श्रीहरी अचानक सोडून गेल्याने प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर इतके भावनाविवश झाले, की इतरांच्या गळ्यात पडून ते हमसून रडले. या दुःखद प्रसंगाचा व्हिडिओ राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सगळे निःशब्द झाले आहेत. श्रीहरी यांनी अल्पवयात आपल्या सुमधुर वादनाने तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला होता. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या प्रत्येक कीर्तनात बारा वर्षांपासून ते मृदंग वादन करत असल्याने अत्यंत लाडके मृदंगवादक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, आई-वडील, भाऊ असा परिवार असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यावर व वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील हजारो जणांनी श्रद्धांजली म्हणून सोशल मीडियावर त्यांच्या फोटोचे स्टेटस ठेवले. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या वेळी उपस्थित असलेल्या इंदुरीकर महाराज यांनाही अश्रू अनावर झाले. सहकारी मित्र डॉ. चव्हाण यांच्या गळ्यात पडून श्रीहरीच्या अचानक सोडून जाण्याने रडतानाचा महाराजांचा व्हिडिओ तसेच सोबतीचा व्हडिओ राज्यभर व्हायरल होत असून, शेकडो जणांच्या स्टेट्सला हे व्हिडिओ आहेत. या निमित्ताने एक सुस्वभावी तरुणासाठी समाज किती हळहळतो, हेही चित्र पुढे आले आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख