नगरमध्ये सर्वाधिक अॅट्राॅसिटीच्या घटना ! डॉ. राऊत यांचे विखे पाटलांना प्रत्युत्तर - The highest incidence of atrocities in the city! Dr. Raut's reply to Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये सर्वाधिक अॅट्राॅसिटीच्या घटना ! डॉ. राऊत यांचे विखे पाटलांना प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 डिसेंबर 2020
राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. विखेंचे कृत्य साऱ्या जगालाच माहिती आहे. अॅट्राॅसिटीच्या सर्वाधिक घटना त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात असून, त्याला आळा घालण्यात अपयश आले.

नागपूर : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्रावरून राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेससोडून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या वादात उडी घेतली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. विखेंचे कृत्य साऱ्या जगालाच माहिती आहे. अॅट्राॅसिटीच्या सर्वाधिक घटना त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात असून, त्याला आळा घालण्यात अपयश आले. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व नसल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

डॉ. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र क्रांतीकारी आणि भविष्यातील काँग्रेसचा सोशल अजेंडा असल्याचे सांगितले. या पत्राद्वारे त्यांनी सरकारला फटकारले नाही, तर मागास ठकांचे हित साधन्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीयांना निधीचे समान वाटप, मागास घटकांना उद्योग, कारखाने, शासकीय कंत्राटात प्रतिनिधित्व, तंत्र शिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रमातही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जाळे तयार करावे, ही चतुर्सूत्री सोनायांनी दिली असून, त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने सरकारकडून कार्य करण्याची ग्वाही डॉ. राऊत यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठीही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळातील मागास घटकांवर अन्याय करणारे निर्णय रद्द करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागास घटकांच्या हिताला आघाडी सरकारचे प्राधान्य राहिले आहे. पण, भाजप सरकारने आघाडी सरकारचे अनेक निर्णय बदलले. काँग्रेसच्या भूमिकेची पुन्हा आठवण करून देण्यासाठी वडिलकीच्या आधारे त्यांनी पत्र लिहिले आहे. आधाडीच्या १३ महिन्यांच्या कालावधीपैकी ८ महिने कोरोनाच्या कठीण काळात गेले. विकास कामांवरही त्याचा निश्चितच परिणाम झाला आहे. पण, कोरोनावरील नियंत्रण हे देखील राज्य सरकारचे मोठे यश असल्याचे ते म्हणाले.

Edited By - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख