माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास - Former MLA Raju Todsam jailed for three months | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांत विलास आकोत यांनी तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : महावितरणच्या कर्मचार्‍यास मारहाण केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवत केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (ता. 21) भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून तोडसाम यांची जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजप नेते राजू तोडसाम हे 17 डिसेंबर 2013 रोजी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले होते. आपल्या कार्यकर्त्याला विजेचे बिल जास्त का आले, याचा जाब त्यांनी कर्तव्यावरील सहायक लेखापाल विलास आकोत यांना विचारला. यावेळी दोघांत वादावादी झाली. रागाच्या भरात तोडसाम यांनी अश्‍लील शिवीगाळ करीत सदर कर्मचार्‍याला कॉलर पकडून मारहाण केली होती.

याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांत विलास आकोत यांनी तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. तपासाअंती 27 नोव्हेंबर 2015 रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी राजू तोडसाम यांना तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध राजू तोडसाम यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती. याप्रकरणी साक्षीदारांनी दिलेली साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी राजू तोडसाम यांचे अपील खारीज करून कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली. त्यानुसार न्यायालयाने राजू तोडसाम पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भादंवीच्या कलम 294 मध्ये तीन महिन्यांचा साधा कारावास व दहा हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच भादंविच्या कलम 252 मध्ये तीन महिन्यांचा साधा कारावास व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास दहा दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. हीच शिक्षा वरिष्ठ न्यायालयाने कायम ठेवली आहे. याप्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. रमेश मोरे यांनी काम बघितले. तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. गणेश धात्रक यांनी कामकाज चालविले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख