आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं हं ! गृहमंत्र्यांच्या मानस कन्येचा रविवारी विवाह - Come to our daughter's wedding! Home Minister's Manas Kanya's wedding on Sunday | Politics Marathi News - Sarkarnama

आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं हं ! गृहमंत्र्यांच्या मानस कन्येचा रविवारी विवाह

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 डिसेंबर 2020
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. कोरोना संदर्भात राज्य सरकारने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत.

नागपूर : समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या वर्षा आणि अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह सोहळा रविवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता पोलिस लाईन टाकळी येथील सद्‍भावना लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे.

गृहमंत्री अनिल आणि आरती देशमुख हे मुलीचे कन्यादान करणार असून, नवरा मुलगा समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रविंद्र आणि ज्योत्सना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा यांना २३ वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत वर्षा आढळली होती. सहा वर्षांची झाल्यानंतर शिक्षणाकरीता संत गाडगेबाबा निवासी मुकबधीर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे केले. दुसरीकडे डोंबिवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरला शंकरबाबा यांनी स्वत:चे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. कोरोना संदर्भात राज्य सरकारने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत. त्या अटींना पाळून या विवाह सोहळ्यात नागरिकांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. जर या मूकबधिर दांपत्यास संसारोपयोगी साहित्य दिले तर मला आनंदच होईल, असे मत सुद्धा यावेळी अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख