सांगली : राज्य सरकार भरकटलेलं आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दुकानदारी मांडली आहे. मंत्रालयात काहीच काम होत नाही. लोक संतप्त आहेत. हा संताप विधान परिषद निवडणुकीत मतातून दिसेल, असा विश्वास ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.
पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ महिला परिषद, गावभागात हरिदास भवन आणि माधवनगर येथे तीन बैठका झाल्या. त्यात ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ प्रमुख उपस्थित होते.
आमदार केळकर म्हणाले, ""एका विचारधारेवर काम करणारे आपले दोन्ही उमेदवार आहेत. पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न थेट विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याची त्यांची क्षमता मोठी आहे. जबाबदारी पेलवू शकणारे चेहरे भाजपने दिले आहेत. मतदार पदवीधर असूनही कित्येक मतं वाया का जातात. त्यासाठी मतदारांना योग्य त्या सूचना द्या. सध्या शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. केंद्र सरकार शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल करीत आहे, मात्र राज्य सरकार उदासीन आहे. शिक्षकांनी कोरोनायोद्धा म्हणून चांगले काम केले, मात्र त्यांनाच त्रास सहन करावा लागतोय.''
शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले, "दोन्ही उमेदवार प्रश्न अत्यंत तळमळीने मांडू शकतात. त्यांना विधानपरिषदेत पाठविण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे.''
सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर म्हणाले, "सांगली शिक्षण संस्था एक विचारधारा घेऊन काम करणारी संस्था आहे. त्यामुळे सांगली शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक 100 टक्के मतदान करतील. आपले मत वाया न जाऊ देण्याची काळजी घेतील.''
स्मितांजली जाधव यांनी स्वागत केले. मुकुंद जोग, श्रद्धा केतकर यांनी आभार मानले. शिक्षक परिषद राज्याचे अध्यक्ष वेनुनाथ कडू, पुणे विभागाचे राजेंद्र नागरगोजे, केदार रसाळ, महेश पाठक, दीपक माने आदी या वेळी उपस्थित होते.
Edited By - Murlidhar Karale

