कोल्हापूर जिल्हा परिषदेत खांदेपालटाचे संकेत 

मागील वर्षी सत्ता बदलताना जे ठरले आहे त्यानुसार होईल, असे सांगत ग्रामविकास मंत्रीहसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील खांदेपालटाचे संकेत दिले आहेत.
hasan-mushrif-final.jpg
hasan-mushrif-final.jpg

कोल्हापूर : मागील वर्षी सत्ता बदलताना जे ठरले आहे त्यानुसार होईल, असे सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील खांदेपालटाचे संकेत दिले आहेत.

वर्षभरापुर्वी सत्ता स्थापन करताना विद्यमान पदाधिकाऱ्यांना एक वर्षाचा कार्यकाल देण्याचे मान्य करण्यात आले होते. वर्षभरानंतर पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. गेली महिनाभर इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया व्यक्‍त केल्याने पदाधिकारी बदलाच्या घडामोडी वेगाने होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता उलथवत गतवर्षी डिसेंबर महिन्यात महाविकास आघाडीने आपले झेंडा रोवला. या सत्ता बदलात मंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील सरुडकर, उल्हास पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली. पदाधिकारी निवडतानाही मोठी कसरत करावी लागली. अनेक रुसवे फुगवे काढून ही सत्ता स्थापन झाली. वर्षभरानंतर सत्ता बदल करण्याचा निर्णय मागील सत्ता स्थापनेवेळीच घेण्यात आला आहे. दरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी कोरोनामुळे मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले होते. मात्र नेत्यांनी या मुतदवाढीस दाद दिलेली नाही. 

विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल डिसेंबर महिन्यात पूर्ण होत असल्याने अनेकांनी आपापल्या नेत्यांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सर्व नेते व्यस्त असल्याने हा विषय बाजुला पडला होता. सोमवारपासून जिल्हा परिषद पदाधिकारी बदल्याच्या हालचाली पुन्हा गतीमान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या या सभागृहाचे हे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे कोणाला पद द्यायचे व कोणाला थांबवायचे, असा प्रश्‍न नेत्यांसमोर असणार आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात निवडणुकांचा फड रंगणार आहे. यामध्ये ग्रामपंचायतीपासून ते गोकुळ, जिल्हा बॅंक व महत्वाचे म्हणजे विधानपरिषद निवडणुकीचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील खांदेपालट नेत्यांसाठी अटळ आहे. 

सध्या कॉंग्रेसकडे अध्यक्ष, राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष, तीन सभापती पद शिवसेनेकडे तर एक सभापती पद स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडे आहे. पुढील बदलात अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची कॉंग्रेस, राष्ट्रवादीत अदलाबदल होण्याची शक्‍यता आहे. तर चार सभापती पदांपैकी दोन पदे शिवसेनाला जाणार आहेत. यातील एक आमदार प्रकाश आबीटकर गट तर दुसरे सभापती माजी आमदार चंद्रदीप नरके गटाला जाणार आहे. एक चंदगड विकास आघाडीस जाण्याची शक्‍यता आहे. खासदार प्रा.संजय मंडलिक हे देखील आपल्या गटासाठी एक सभापती पद मागण्याची शक्‍यता आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com