घरगुती वीज बिलातही सवलत देण्याचा विचार - Consideration of concessions on household electricity bills | Politics Marathi News - Sarkarnama

घरगुती वीज बिलातही सवलत देण्याचा विचार

सुनील पाटील
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

चंद्रकांत पाटील सतत शरद पवार यांच्यावर टीका करतात. ५० वर्षे शरद पवार निवडणूक हारलेले नाहीत. मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत; मात्र ज्या दादांना दहा वर्षांत स्वत:चा मतदारसंघ तयार करता आला नाही.

कोल्हापूर : राज्य सरकारने नुकतेच कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिलात माफी, सवलत देण्याचा निर्णय घेतला. आता घरगुती वीज बिलात सवलत देण्याचा विचार करीत असल्याचे सूतोवाच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेताना पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर फटकेबाजी केली.

मुश्रीफ म्हणाले, ‘‘चंद्रकांत पाटील सतत शरद पवार यांच्यावर टीका करतात. ५० वर्षे शरद पवार निवडणूक हारलेले नाहीत. मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत; मात्र ज्या दादांना दहा वर्षांत स्वत:चा मतदारसंघ तयार करता आला नाही, मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघ टिकवता आला नाही, ते आता पवार यांच्यावर टीका करत आहेत.’’

राज्य सरकारने वर्षभरात चांगले काम केले

सत्ता आल्याच्या काही दिवसांतच कोरोनाची महामारी आली. त्याला सरकार धीराने तोंड देत आहे. निधीचे स्रोत आटले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्याला १२ हजार ५०० कोटी पगारासाठी द्यावे लागत आहेत. सरकारी तिजोरीत महिन्याला तीन हजार कोटी जमा होत असताना नऊ हजार कोटींचे कर्ज घेऊन पगार केले जात आहेत. शासनावर ६४ हजार कोटींचे कर्ज झाले आहे. आरोग्यावरही खर्च सुरू आहे. अशा सर्व परिस्थितीत राज्य सरकारने वर्षभरात चांगले काम केले आहे, असे मुश्रीफ म्हणाले. 

दुसऱ्या लाटेची काळजी घ्या

दिल्ली, अहमदाबाद येथे कोरोनाचे रुग्ण जास्त वाढत आहेत. त्यामुळे आपल्याकडेही दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. कोरोना आपल्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे सर्वानी खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

बोबडं सोमय्या

‘‘भाजपची मंडळी सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करीत आहेत. बोबडं किरीट सोमय्या तर उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचीच सारखं चौकशी करा म्हणतंय. ठाकरे यांच्या पूर्वजांची संपत्ती आहे. याच्या बापाचं काय जातंय, समजत नाही,`` असा टोला मुश्रीफ यांनी लावला.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख