उद्धवजी पुढचे दिवस चांगले नाहीत : आमदार विनायक मेटे - Uddhavji next days are not good: MLA Vinayak Mete | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धवजी पुढचे दिवस चांगले नाहीत : आमदार विनायक मेटे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

शनिवारी (ता. पाच) शहरात मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी ‘मराठा आरक्षण क्रांती संघर्ष मोर्चा; लढा आरक्षणाचा’ नावाने मोर्चा निघाला.

बीड : छत्रपतींचा मावळा कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलेल्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. सरकारने आता तरी लक्ष द्यावे, अन्यथा पुढचे दिवस चांगले नाहीत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावे. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे आरक्षण वगळता सोयी - सवलती व शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती द्यावी. पाच तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिला. (Uddhavji next days are not good: MLA Vinayak Mete)

शनिवारी (ता. पाच) शहरात मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी ‘मराठा आरक्षण क्रांती संघर्ष मोर्चा; लढा आरक्षणाचा’ नावाने मोर्चा निघाला. मोर्चानंतर मेटे यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना मागण्यांचे निवेदन दिले.

या वेळी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह राजन घाग, सुनिता घुले, सुभाष जावळे, मनोज जरांगे, रमेश पोकळे, सुधीर काकडे, अनिल घुमरे, बी. बी. जाधव, अॅड. मंगेश पोकळे, स्वप्नील गलधर, विनोद इंगोले, किशोर गिराम आदी उपस्थित होते. तत्पुर्वी सभेत श्री. मेटे बोलत होते. 

मेटे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे गेले. चव्हाण मुख्यमंत्री असताना बापट आयोगाने दिलेला अहवालही त्यांनी फेटाळला नाही. काँग्रेसच्या मनात कायम मराठा समाजाविषयी गरळ आणि विष आहे. म्हणूनच अण्णासाहेब पाटील यांची आत्महत्या नव्हे, तर काँग्रेसधोरणाची हत्या होती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, समाजाला आरक्षण आणि सोयी मिळेपर्यंत आपण व नरेंद्र पाटील राज्यात फिरणार असेही मेटे म्हणाले. मराठा आमदारांनी समाजाच्या मागण्या दबाव टाकून मान्य करुन घ्याव्यात. ज्यांना समाजाचे देणे - घेणे नाही त्यांना मराठा म्हणवून घेण्याचा अधिकारी नाही, असेही विनायक मेटे म्हणाले. सरकार लाथा घातल्याशिवाय जागे होत नाही. आम्ही मोर्चाची हाक आणि खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतरच ईडब्ल्यूएस आरक्षण मिळाले, असा दावाही त्यांनी केला.
 

हेही वाचा...

शासकीय कार्यालयावर भगवा लावण्यास सदावर्तेंचा विरोध

हेही वाचा..

मराठा आरक्षण, पुन्हा न्यायालयीन लढाईची तयारी

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख