पाचोरा : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची सेना आठवावी. आपण काय बोलतो, याचे भान ठेवावे. सध्या खासदार संजय राऊत यांचीच चापलुशी चालते, ती त्यांनी तांबवावी, असा सल्ला भाजप नेते गिरीश महाजन यांनी खासदार राऊत यांना दिला.
पाचोरा येथे अटल भाजपा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महाजन बोलत होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू भोळे अध्यक्षस्थानी होते. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती सतीश शिंदे यांच्या सहकार्याने पाचोरा व भडगाव येथे हे कार्यालय बांधण्यात आले आहे.
महाजन म्हणाले, की सरकार काहीच करायला तयार नाही. विजेचा प्रश्न गंभीर आहे. कर्जमाफी नाही, भरती नाही, राज्याचे प्रमुख व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री घरातून बाहेर निघायला तयार नाहीत. भाषणे देऊन व ऑनलाइन संवाद साधून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची सेना आठवावी. आपण काय बोलतो व काय करतो, याचे भान ठेवावे. सध्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात संजय राऊत यांची चापलूसी चालते, त्यांनी ती थांबवावी. नाकर्तेपणाचे परिणाम राज्यकर्त्यांना भविष्यात दिसतील, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
कोणी इतर पक्षात गेले म्हणून सर्व संपत नाही
एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता ते म्हणाले, की भाजपा हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून तो विचारावर चालणारा पक्ष आहे. मी गेलो म्हणून संपले, असे होत नाही. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संघ, ग्रामपंचायती, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती या महत्त्वाच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा, असे अवाहनही त्यांनी केले.
Edited By - Murlidhar Karale

