उस्मानाबाद : मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांना लक्ष्य करत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्याच्या उद्योगाच्या प्रश्नाबाबत बैठक लावण्याची मागणी केली होती. त्याला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उत्तर दिले आहे, ज्यानी उद्योग बुडविले त्यानी उद्योग उभारण्याचा सल्ला देऊ नये, असा प्रतिटोला लगावला आहे.
आमदार राणा पाटील म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार आहेत. गेली ६ वर्षे आपण उद्योग मंत्री आहेत त्यामुळे आपण शिवसेनेचे मंत्री व राज्याचे उद्योग मंत्री म्हणून पुढाकार घ्यावा व उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी व इथल्या तरुणांच्या हाताला काम देऊन अर्थकारणाला चालना मिळावी, यासाठी व्यक्तिशः लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार पाटील यानी केली होती.
कौडगाव येथे २५० मेगा वॅट क्षमतेचा हायब्रीड सौर प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची व्हर्चुअल बैठक आयोजित करावी व त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. नवीन सरकार स्थापण झाल्यावर देखील दोन वेळा याबाबत आपण पत्र लिहल्याचे सांगुन अजून त्यावर कसलीही कार्यवाही होत नाही, याबद्दल आमदार पाटील यांनी खेद व्यक्त केला.
यावर उत्तर देताना खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, मुख्यमंत्री व उद्योगमंत्री जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने विविध प्रश्नासंदर्भात बैठका घेत आहेत, त्यामुळे उद्योग बुडविणाऱ्यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नयेत.तुमच्या आजवरच्या कारकिर्दीचा आलेख जनतेला ज्ञात आहे. तुमचा शहाजोगपणा जनतेच्या चांगलाच लक्षात आला आहे. जिल्ह्याच्या विकासांची तुम्ही चिंता करु नका व मुख्यमंत्र्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडु नका. उद्योग विषयावर बैठक लावण्याची विनंती करण्याअगोदर आमदारांनी माहिती घ्यायला हवी होती, असा चिमटा काढत खासदार राजेनिंबाळकर यानी उद्योगमंत्री यांच्या उपस्थिती मध्ये जिल्ह्याच्या उद्योगाच्या प्रश्नासंबंधी बैठक पार पडल्याचे सांगितले. त्यानंतर खास तुमच्यासाठी बैठक आयोजीत करावी ही मागणी म्हणजे 'विनोद'च मानला पाहिजे असाही टोला खासदार ओमराजे यानी लगावला. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री आहेत म्हणुनच तर आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी ही बैठक बोलावल्याचेही त्यांनी प्रतिउत्तर दिले. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा, आमच्या नेतृत्वानी काय करावे. हे सांगण्याइतकी तुमची पात्रता नसल्याचेही खासदार ओमराजेनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
जिल्ह्याच्या जनतेला उद्देशुन ते राजेनिंबाळकर म्हणाले की, जिल्ह्याच्या विविध प्रश्नासंबंधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने बैठका घेऊन त्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी समोर आलेल्या अडचणीची सोडवणुक करण्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न देखील सुरु केले आहेत. पण आम्हाला नुसते पत्रक काढुन गाजावाजा करायची सवय नाही. जे काय होतय ते आमच्यामुळेच असला स्वभावही आमचा नाही.विकासांच्या बाबतीत आमचं सरकार कटिबध्द असून, योग्य दिशेन काम करत आहे, असा विश्वास खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.
Edited By - Murlidhar Karale

