जळगाव : जळगाव जिल्ह्यात रेमडेसिविर इंजे्शनच्याचा तुटवडा असल्याचा आरोप माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला, त्याला उत्तर म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी महाजन यांच्या जामनेर मतदार संघात जावून रियालिटी चेक केला असता तेथे पुरेशा प्रमाणात इंजेक्शन्स साठा असल्याचे आढळून असल्याचा दावा केला आहे.
याशिवाय जिल्ह्यात आणखी पाच हजार इंजेक्शनचा साठा तातडीने उपलब्ध होत असल्याची हमी त्यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. यात जामनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असतानाच वैद्यकीय सुविधेचा बोजवरा उडालेला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील कोरोना बाधीत रूग्ण हे कोविड केअर सेंटरमधून पळून घरी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर एकाच दिवशी तब्बल १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याने येथील परिस्थिती भयावह बनल्याची स्थिती जगासमोर आली होती.
कालच आमदार गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात रेमडेसिविर कृत्रीम टंचाई निर्माण केल्याने याचा तुटवडा भासत असल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमिवर आज सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जामनेर व पहूर येथे सरप्राईज व्हिजीट दिली. त्यांनी शहरातील उपजिल्हा रूग्णालय आणि दोन खासगी रूग्णालयांमधील कोविड सेवेचा आढावा घेतला. यात त्यांनी झाडाझडती घेऊन दर्जेदार रूग्णसेवा करण्याची तंबी दिली.
अनेक खासगी रूग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा पैशांची आकारणी करण्यात येत असतानाच रूग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचेही दिसून आल्याने पालकमंत्र्यांनी याबाबत संबंधीतांना निर्देश दिले.
या बाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा रूग्णालयात देखील सध्या एक हजार इंजेक्शन्स उपलब्ध असून, लवकरच पाच हजारांचा स्टॉक दाखल होणार आहे. यामुळे रेमडेसिविर हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती देखील पाटील यांनी दिली.
या वेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, तहसीलदार शेवाळे, ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. अन्सारी, डॉ. वैभव अग्रवाल, डॉ. सिसोदिया, पहूर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, बाबुराव घोंगडे, डॉ. हर्षल चांदा यांच्यासह आरोग्य कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पहूर येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. रूग्णांना सर्वतोपरी सेवा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Edited By - Murlidhar Karale

