धुळे : भाडोत्री नेत्यांनी धनगर समाजात फूट पाडली. त्यामुळे आरक्षणापासून समाज वंचित राहात आहे. ते लक्षात आल्याने धनगर समाज महासंघाशिवाय आपल्याला पर्याय उरलेला नाही, याची जाणीव असंख्य समाजबांधवांना झाली आहे. माझे सध्या वय वर्षे ८५ आहे. समाजाच्या भल्यासाठी आरक्षणाचा लढा लढत आहे. ते मिळाल्याशिवाय जीव सोडणार नाही, अशी भूमिका माजी मंत्री तथा राज्य धनगर महासंघाचे संस्थापक अण्णा डांगे यांनी आज मांडली.
धुळ्यात सैनिकी लॉन्समध्ये धनगर समाज महासंघाची बुधवारी राज्यव्यापी बैठक होती. यासंदर्भात डांगे म्हणाले, की धनगर समाजातील ३२ शाखांना संघटित करून हा समाज सशक्त करण्याचा विडा उचलला आहे. केंद्र व राज्य सरकारला, नियुक्त विशेषाधिकार समितीला वेळोवेळी १६० पानांचे पुरावे सादर केल्याने धनगड आणि धनगर या एकच अर्थी शब्दाबाबत आता प्रश्नच उरलेला नाही.
केवळ पवारांवर टिका
डांगे यांनी सांगितले, की देशाचे नेते शरद पवार यांनी ३१ जुलै १९१४ च्या आत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, समाजातील काही विघ्नसंतोषींना ही चांगली भूमिका बघवली नाही. हनुमंत सूळ यांच्या नेतृत्वात पंढरपूर ते बारामती मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजातील कार्यकर्त्यांना पैसे देऊन मोर्चा घडविण्यात आला. बारामती मतदारसंघात धनगर बांधवांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांच्या जिवावर नेते शरद पवार निवडून येतात अशा दृष्ट हेतूने केलेल्या या आंदोलनात केवळ शरद पवार यांच्यावर टिका झाली.
ते म्हणाले, की माझ्यावर आंदोलक अशी टीका करत असतील, तर त्यांना घेऊ द्या, आरक्षण कुणाकडून घ्यायचे ते आणि ही संधी देवेंद्र फडणवीस यांनी साधली आणि आम्हाला निवडून दिल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करू, अशी हमी दिली. प्रत्यक्षात तसे घडलेच नाही, असे डांगे यांनी निदर्शनास आणले.
हनुमंत सूळ गेले कुठे?
तेव्हा पंढरपूर ते बारामती मोर्चा काढणारे हनुमंत सूळ नेमके आता आहेत कुठे? ते नेते आहेत का? कुठल्या चळवळीत दिसतात का, असे प्रश्न उपस्थित करत डांगे म्हणाले, की धनगर समाजात खूप नेते व ते वेगवेगळे राजकीय पक्ष, संघटनांमध्ये असून, त्याचा फायदा घेत भाडोत्री नेते निर्माण करायचे, धनगर समाजात फूट पाडायची, शरद पवार यांना बदनाम करायचे एवढाच उद्योग सुरू असल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे सांगितले, तर श्रेयासाठी गल्लीबोळात संघटना, नेते तयार झाले. यात नितीन गडकरींनीही महात्मेंना खासदार करून समाजाचा एक तुकडा पाडल्याचा आरोप श्री. डांगे यांनी केला.
ठाकरेंची आशादायक भूमिका
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर व धनगड शब्दाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन, अभ्यास करून आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. यात राज्याने केंद्राला शिफारस करायची आहे. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून काहीही नको. घटना समितीने धनगर समाजाला कशातून आरक्षण द्यावे ते ठरवायचे आहे. ते पदरात पाडून घेतल्याशिवाय जीव सोडणार नाही, असे डांगे यांनी नमूद केले. वार्तालापवेळी प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ, युवा नेते मनोज गर्दे उपस्थित होते.
Edited By - Murlidhar Karale