करमाड : लाडगाव (ता. औरंगाबाद) येथील छत्रपती लाॅन्स येथे शनिवारी
(ता. 5) ओबीसी व्हीजे/ एनटी जनमोर्चाची मराठवाडा विभागीय बैठक पार पडली. यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन बाळासाहेब सानप यांनी केले होते. या विभागीय बैठकीला बॅनर बाजीपासूनच ग्रहण लागल्याचे दिसून आले. जालना महामार्गावर ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरवर आयोजक म्हणून नाव असलेले सानप यांचा ओबीसी नेते म्हणून उल्लेख करण्यात आला. याच वेळी यावर (कै.) गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र छापण्यात आला आहे.
दरम्यान, कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांचा फक्त छायाचित्र छापण्यात येऊन त्यांचे नाव व पदाचा कुठलाही उल्लेख त्यावर करण्यात आला नव्हता. सोबतच कार्यक्रमाच्या ठिकाणाचाही समजेन, असा पत्ता दिला नसल्याने शनिवारी सकाळपासूनच या कार्यक्रमाची उलट-सुलट चर्चा सुरू होती.
कार्यक्रम सुरू असताना बालाजी शिंदे या व्यक्तीचे भाषण सुरू असताना शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्या ओबीसी नेता व समाजाविषयी, त्यांचे कार्य या विषयी नकारात्मकता व्यक्त केल्याने यास समता परिषदेच्या कार्यकर्यांनी आक्षेप घेत त्यांचे भाषण थांबवले.
ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ यांचे कार्य मोठे असल्याचे सांगत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके व कार्यकत्यांकडून या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रम स्थळावरील बॅनरवरही छगन भुजबळ यांचे छायाचित्र छापलेला नव्हता. यावरही कार्यक्रमात चांगलीच खडाजंगी झाली. हे सर्व मंत्री वडेट्टीवार यांच्यासमोर घडले. शेवटी वडेट्टीवार यांनी मध्यस्थी करत प्रकरण शमवताना भुजबळ यांचे समाजाविषयीचे कार्य मोठे असल्याचे सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Edited By - Murlidhar Karale

