अशोक चव्हाण यांच्यामुळेच मराठा समाजावर वाईट वेळ : विनायक मेटे - Bad times on Maratha community because of Ashok Chavan: Vinayak Mete | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक चव्हाण यांच्यामुळेच मराठा समाजावर वाईट वेळ : विनायक मेटे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 जानेवारी 2021

शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्य कार्यकारिणीची तापडिया नाट्यमंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक विषयांवर ठराव घेण्यात आला.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी अशोक चव्हाण व त्यांचा कंपू दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यामुळेच आरक्षणाच्याबाबतीत अपयश आले आहे. चव्हाणांमुळेच मराठा समाजावर वाईट वेळ आली आहे. त्यांनी केवळ राजकारण केले असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्य कार्यकारिणीची तापडिया नाट्यमंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक विषयांवर ठराव घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत आमदार मेटे म्हणाले, की एसईबीसी व ईएसबीसीच्या तीन हजार तरुणांच्या नियुक्त्यांना न्यायालयाने स्थगिती दिली नसतानाही, केवळ अशोक चव्हाण यांच्या हट्टामुळे त्यांना अद्यापही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत सगळीकडे अपयशी ठरले आहेत. चव्हाण आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत एकही सुनावणी मराठा समाजाच्या बाजूने झाली नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांना बोलावले नाही, त्यांच्याही लक्षात आले की ते अकार्यक्षम आहेत. पण सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी परिवहनमंत्री अनिल परब आणि ॲड. विजयसिंग थोरात यांच्यावर आता जबाबदारी सोपवली आहे.

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लढणार

आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका निवडणुका शिवसंग्राम लढवेल. २०१४ पासून शिवसंग्राम भाजपसोबत आहे. त्यांनी अनेकवेळा, अनेक ठिकाणी अन्याय केलेला, दूर केलेले कार्यकर्त्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे; परंतु भाजपसोबत युती कायम आहे. सोशल मीडियात संभाजीनगर लिहिले म्हणजे नाव बदलत नाही, त्यासाठी नोटिफिकेशन काढावे लागेल. नामकरण झाले तर शिवसंग्राम त्याचे स्वागत करेल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही मराठा समाजाचे प्रश्न, त्यांची फरपट का दिसत नाही? त्यांनी ठरवले तर सर्वांना एकत्र आणून ते यातून मार्ग काढू शकतात, असेही आमदार मेटे यांनी नमूद केले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख