औरंगाबाद मनपाची पंचाईत ! आयुर्वेदिक काढा केवळ 20 किलो, इतर रुग्णांचे काय? - Aurangabad Municipal Corporation Panchayat! Ayurvedic extract only got 20 kg, what about other patients? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

औरंगाबाद मनपाची पंचाईत ! आयुर्वेदिक काढा केवळ 20 किलो, इतर रुग्णांचे काय?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 जुलै 2020

औरंगाबाद शहरातील बाधितांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेने देखील रुग्णांना काढा देण्याचा निर्णय घेतला. मात्र शोधून-शोधून फक्त २० किलो काढा महापालिकेला मिळाला.

औरंगाबाद : कोरोनावर उपचार करण्यासाठी होमिओपॅथीक, आयुर्वेदिक पद्धतीही सरकारने अंगिकारली. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास येताच महापालकेने देखील असा आयुर्वेदिक काढा देण्याचे ठरविले. परंतु सर्वत्र शोधून केवळ 20 किलो काढा मिळाला. अवघ्या दोन-तीन दिवसांत तो संपला. आता नव्याने काढा पुरवठादारांची शोधमोहीम सुरू झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील बाधितांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेने देखील रुग्णांना काढा देण्याचा निर्णय घेतला. मात्र शोधून-शोधून फक्त २० किलो काढा महापालिकेला मिळाला. तो दोन ते तीन दिवसात संपला. आता नव्याने पुरवठादार व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. 

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. लस किंवा औषधी उपलब्ध झाल्याशिवाय कोरोनावर मात करणे शक्य नसल्यामुळे जगभरात संशोधन सुरू आहे. त्यात योग गुरु रामदेव बाबा यांनी औषधी बाजारात आणून आयुर्वेदावर पण चर्चा घडवून आणली. त्यापूर्वीच आयुष्य मंत्रालयाने देखील रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काढा उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महापालिकेने रुग्णांना काढा देण्याचा निर्णय घेतला. पण काढ्यासाठी आवश्‍यक तुळशी पाने, लवंग, सुंठ, दालचिनी, काळी मिरी उपलब्ध करून ती वाटून आणायची कुठून असा प्रश्‍न पडला. दरम्यान बीड येथील डॉ. चरखा यांनी महापालिकेला २० किलो काढा देण्याची तयारी दर्शविली. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या पाहता हा काढा फक्त दोन ते तीन दिवसच पुरला. डॉ. चरखा यांची पुरवठ्याची तयारी असली तरी बीड येथे जाऊन काढा आणण्यासाठी हेलपाटा मारावा लागणार आहे. त्यामुळे शहर परिसरात कुणाकडे काढा मिळतो का? याचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात आहे. 

दरम्यान, दिवसातून दोनवेळा काढा देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र काढा तयार करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. जेवढा काढा तयार करायचा आहे, त्यापेक्षा दुप्पट पाणी गॅसवर ठेऊन ते अर्धे होईपर्यंत उकळावे लागते. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना जेवण देताना महापालिका प्रशासनाची धावपळ होत आहे. त्यात काढ्याचा ताण वाढला आहे. 

मालेगावात घटली रुग्णसंख्या 

मालेगावमध्य कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र युनानी काढ्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा केला जात आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख