मुंबई/परभणी : परभणी जिल्ह्यातील जिंतूर बाजार समितीवर कोणाचा झेंडा फडकणार यावरून आता महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे राहीलेत. मात्र यात आता शिवसेना नेतृत्त्व अॅक्टिव्ह झा्ल्याचे समजते आहे.
परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी नाराज होऊन आपल्या खासदारकीचा राजीनामाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. मात्र वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिष्टाई करत काल मध्यरात्री एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आणि जिंतूरच्या वादावर तोडगाही काढल्याचे सांगण्यात आले. ते आज सकाळी खासदार संजय जाधव यांच्याशी बोलले. सकाळी सात आणि दहा वाजता फोनवरून दोघांची दोनवेळा सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता निरोपही दिला असल्याची माहिती मिळते आहे.
नक्की काय घडले?
स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधीकडून सातत्याने अडवणुक होत असल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी बुधवारी (ता.२६) मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. या संदर्भात खासदार श्री. जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठविले असून या पत्रात संपूर्ण मतदार संघासह इतर भागात राष्ट्रवादी कॉग्रेसची मोनोपॉली वाढत जात असल्याने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीसह इतरांची कामे होत नसल्याची तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्यासह अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसकडून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खंत खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमुद केली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी वारंवार हस्तक्षेप करत आहेत. त्यांची दादागिरी वाढत जात असल्याचेही या पत्रात खासदारांनी नमुद केले असल्याचे समजते. तसेच त्यांनी जिल्ह्यासह राज्यातील काही धोरणात्मक निर्णयातील एकतर्फी हस्तक्षेपाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने वारंवार एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयप्रक्रिये विरुद्ध पक्षप्रमुखांनी तातडीने व गांभीर्याने दखल घ्यावी असेही या पत्रात खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे. राज्यात सत्तेत असतानासुद्धा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एकतर्फी भूमिका, निर्णय पूर्णतः चुकीचे असल्यासाचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पत्राची गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, खासदार संजय जाधव यांच्या या नाराजीमुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील बेबनाव स्पष्टपणे सर्वसामान्यासमोर आला आहे.
राजीनामा नाट्य गुलदस्त्यातच
राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या दादागिरीचा उल्लेख करत खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिला असल्याच्या बातम्या राज्यभर वाऱ्या सारख्या पसरल्या.परंतू यावर शिवसेनेच्या गोटातून मौनच बाळगण्यात आले. खासदार संजय जाधव यांचा ही फोन बंदच होता. त्यामुळे त्यांनी पत्रासोबत राजीनामा दिला की नाही याचा उलगडा मात्र झाला नाही.

