औरंगाबाद : आमच्या भागात टवाळखोर हैदोस घालतात. त्यांचा बंदोबस्त करा, अशा शब्दांत औरंगाबादमधील ज्येष्ठ नागरिकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कैफियत मांडली. दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाने आधार कार्ड काढून हवे, असल्याची मागणी देशमुख यांच्याकडे केली. देशमुख यांनीही या दोन्ही समस्या सोडविण्याच्या सूचना पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना दिल्या.
औरंगाबाद पोलिस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक मदत केंद्राचा शुभारंभ गृहमंत्र्यांनी वेगळ्या पद्धतीने केला. त्यांनी स्वतः ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडविण्याच्या सूचना केल्या. नमस्कार, मी राज्याचा गृहमंत्री बोलतोय. तुम्हाला काही अडचण आहे का, अशी विचारणा खुद्द अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांना दूरध्वनीवरून केली.
पोलिस आयुक्तालयात सुरू झालेल्या या केंद्राकडून शहरातील ज्येष्ठांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. त्यासाठी १००९ हा क्रमांक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहर पोलिस ज्येष्ठ नागरिकांना स्वत:हून फोन करणार असून त्यांचे आजार व इतर अडचणींची चौकशी करणार आहेत.
महिला बिट अंमलदारांचा पिंक स्क्वॉड
पोलिस आयुक्तालयात गृहमंत्र्यांच्या हस्ते पेट्रीलींगसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्यूआर कोड स्कॅन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यापुढे पेट्रोलींगवर असणाºया कर्मचाºयांना हा क्यूआर कोड स्कॅन करून त्या ठिकाणाहून सेल्फी अपलोड करावी लागणार आहे. शहरात एक हजार ठिकाणी हा कोड बसविण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता तंत्रज्ञान अधिक अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या वेळी आमदार विक्रम काळे, अमोल मिटकरी आदी उपस्थित होते.
औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यात ठाणेनिहाय महिला बीट अंमलदार नेमले आहेत. यामुळे आतापर्यंत कारकुनी काम करणाºया महिला अंमलदार तपास,चौकशी अशी महत्वाची कामे करणार आहेत. या उपक्रमाचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले. पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ४० महिला बीट अंमलदारांचा सत्कारही करण्यात आला. या बीट अंमलदारांच्या टीमला पिंक स्क्वॉड किंवा वेगळे नाव द्या. त्यांच्या दुचाकीला फ्लॅश लाईट लावा, अशा सूचनाही अनिल देशमुख यांनी केल्या.

