पालघर हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे द्या! भाजपपुरस्कृत संघटनांची मागणी - Handover Palghar Lynching case to CBI Demands BJP | Politics Marathi News - Sarkarnama

पालघर हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे द्या! भाजपपुरस्कृत संघटनांची मागणी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सदर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याबाबत पूर्वीपासून मागणी केली जात होती; मात्र सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतर आता सरकारला कात्रीत पकडण्यासाठी ही मागणी जोर धरत आहे. १६ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू व वाहनचालकाची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी १०६ जणांना ताब्यात घेतले

वसई : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतर आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणही सीबीआयकडे सोपवावे, या मागणीसाठी भाजपपुरस्कृत संघटनांकडून प्रयत्न केले जात असून त्यांची ही मागणी ट्विटरसह अन्य समाजमाध्यमांवर ट्रेंड करत होती. 

सदर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याबाबत पूर्वीपासून मागणी केली जात होती; मात्र सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतर आता सरकारला कात्रीत पकडण्यासाठी ही मागणी जोर धरत आहे. १६ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू व वाहनचालकाची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी १०६ जणांना ताब्यात घेतले. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू असून सरकारने सीबीआय तपासाची मागणी फेटाळून लावली, परंतु सुशांतसिंग राजपूत प्रकरणासारखेच पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार आहोत, असे मत पालघर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मांडले आहे.

पालघरची घटना निंदनीय असून साधूंना न्याय मिळण्यासाठी राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे. वारंवार मागणी करूनही सरकारकडून कोणतेच प्रयत्न केले जात नाही, हेच या प्रकरणाचे दुर्दैव.
- मनोज बारोट, जिल्हाध्यक्ष, वसई-विरार, भाजप

सुरुवातीपासून आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली; मात्र सरकारकडून त्याबाबत प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. सीबीआय तपासासाठी समाजमाध्यमांवरही मागणी वाढत आहे, त्यामुळे सरकारने हा तपास सीबीआयकडे द्यावा.
- संतोष जनाटे, संघटक सरचिटणीस, पालघर जिल्हा, भाजप

Edited By- Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख