तोपर्यंत आमदारकीची पेन्शन घेणार नाही : दत्ता सावंत - Until then, I will not take MLA's pension Says Teachers MLC Datta Sawant | Politics Marathi News - Sarkarnama

तोपर्यंत आमदारकीची पेन्शन घेणार नाही : दत्ता सावंत

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

 मीही जुन्या पेन्शन योजनेत अडकलेला शिक्षक आहे. या सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे मी आमदार झालो, हे कधीही विसरणार नाही. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर याबाबतचा अध्यादेश निघणार असल्याचे सांगून आमदार सावंत यांनी शिक्षक समायोजन, उच्च माध्यमिक शिक्षक तुकडी अनुदान आदींबाबत प्रतिनिधीक चर्चा केली. 

औंध (ता. खटाव) : राज्यातील 2005 पूर्वीच्या शिक्षकांसाठी प्रलंबित जुनी पेन्शन योजना लागू केली जात नाही तोपर्यंत मी विधान परिषद सदस्यत्वाची पेन्शन स्वीकारणार नाही, अशी ग्वाही शिक्षक आमदार दत्ता सावंत यांनी दिली. 

औंध येथील श्री श्री विद्यालयात महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हास्तरावरील पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार सावंत बोलत होते. मीही जुन्या पेन्शन योजनेत अडकलेला शिक्षक आहे. या सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे मी आमदार झालो, हे कधीही विसरणार नाही.

राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर याबाबतचा अध्यादेश निघणार असल्याचे सांगून आमदार सावंत यांनी शिक्षक समायोजन, उच्च माध्यमिक शिक्षक तुकडी अनुदान आदींबाबत प्रतिनिधीक चर्चा केली.  आपल्या तेहतीस वर्षाच्या ज्ञानदानाच्या योगदानानंतरही प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली जात नाही.

गुणगौरव केला जात नाही. म्हणून राज्यातील अशा दुर्लक्षित शाळा व शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.  यावेळी आदर्श कृतिशील मुख्याध्यापक अशोक देशमुख (यशवंतराव चव्हाण हायस्कूल, जायगाव), मुख्याध्यापक पोपट मिंड (कमलेश्वर विद्यालय, विखळे), आदर्श कृतिशील शिक्षक दत्तात्रय देशमुख व परशुराम राऊत (छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज).

तसेच बापूराव गायकवाड (सिद्धेश्वर विद्यालय, कुरोली), दिलीप काळे (हनुमानगिरी विद्यालय, पुसेगाव), श्रीमंत कोकरे (भारतमाता विद्यालय, मायणी), सौ. सवाखंडे (न्यू इंग्लिश स्कूल, खटाव), लक्ष्मण गुरव (लिपिक, बनपुरी हायस्कूल), अजित काळे (हनुमानगिरी विद्यालय, पुसेगाव), आदर्श कृतिशील शाळा पुरस्कार श्री सेवागिरी विद्यालय, पुसेगाव यांना देण्यात आला. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख