तर इतिहास तुम्हाला, आम्हाला माफ करणार नाही : शिवेंद्रसिंहराजे - So history will not forgive us says MLA Shivendraraje | Politics Marathi News - Sarkarnama

तर इतिहास तुम्हाला, आम्हाला माफ करणार नाही : शिवेंद्रसिंहराजे

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

परिषदेच्या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंचे आगमन होताच त्यांचे जोरदारपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांपुढे शिवेंद्रसिंहराजेंनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आमदार म्हणून अथवा राजा म्हणून मी येथे आलेलो नाही. मी मराठा समाजातील घटक म्हणून आलो आहे. मराठा समाजाच्या लढ्याला यश येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत आहात त्यास माझा पाठींबा आहे.

सातारा : मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. हा लढा तोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये. लोक नेहमी बोलतात, इतिहासात मराठा समाजाचे एकदा पानिपत झाले आहे. त्यामुळे आता जर आपण सर्वजण एकत्र आलो नाही, तर दुसरे सामाजिक पानिपत व्हायची वेळ मराठा समाजावर येईल आणि इतिहास तुम्हाला आणि आम्हाला पुन्हा माफ करणार नाही, असा इशारा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
 
साताऱ्यातील कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात मराठा समाजाची आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी विभागीय गोलमेज परिषद आज सुरू झाली आहे. या परिषदेस साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. यावेळी  मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेशदादा पाटील, मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांच्यासह पाच जिल्ह्यातील मराठा मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. 

परिषदेच्या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंचे आगमन होताच त्यांचे जोरदारपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांपुढे शिवेंद्रसिंहराजेंनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आमदार म्हणून अथवा राजा म्हणून मी येथे आलेलो नाही. मी मराठा समाजातील घटक म्हणून आलो आहे. मराठा समाजाच्या लढ्याला यश येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत आहात त्यास माझा पाठींबा आहे.

आम्हाला दूस-या समाजाचे आरक्षण काढून द्या, असे आम्ही म्हणत नसून आम्हांला आमचे द्या अशीच आपल्या सर्वांची मागणी आहे. मराठा समाज एकत्र नसल्याची खंत व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सर्व मराठा बांधवांना माझी व्यक्ती म्हणून विनंती आहे.  सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढावा. हा लढा तोडण्याचा प्रयत्न कुणी करू नये. काही लोक एकत्र बसल्यावर नेहमी सांगतात.

इतिहासात मराठा समाजाचे एकदा पानिपत झालेले आहे. आणि आता जर आपण सर्व जण एकत्र आलो नाही, तर दुसरे सामाजिक पानिपत व्हायची ही मराठ्यांवर दुसरी वेळ असेल. आता इतिहास तुम्हाला आणि आम्हाला पुन्हा माफ करणार नाही. आरक्षणामुळे आजच्या पिढीवर फार मोठा परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार राज्य सरकार अथवा केंद्र सरकारसह सर्वच पक्षांनी केला पाहिजे.

युवा वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अन्यथा, भविष्यात महाराष्ट्रातील सामाजिक घडी विस्कटेल, अशी भितीही व्यक्त करून  मराठा समाजातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टया मागासलेल्यांना या आरक्षणाचा फायदा व्हावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्रित लढा देऊ या, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख