महाराष्ट्रात रस्त्यावर लूटमार करणाऱ्या पोलिसांनो हे ऐका आणि जरा तरी सुधारा! - Maharashtra police listen to this and change the behavior | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात रस्त्यावर लूटमार करणाऱ्या पोलिसांनो हे ऐका आणि जरा तरी सुधारा!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

महाराष्ट्रातील पोलिस कसे लूटमार करतात, याचा हा दाहक अनुभव 

सातारा : महाराष्ट्रात आम्ही धार्मिक पर्यटनासाठी येतो, त्यावेळी येथील पोलिस आमच्या गाड्या आडवून पैसे मागतात. आमच्या गाड्यांची सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही आमच्याकडून पैसे घेतले जातात. काही वेळेस  मारहाणही होते. मुख्यमंत्री साहेब तुमच्या पोलिसांना पगारातून मिळणारे पैसे कमी पडत आहेत का, त्यामुळे हे बाहेरच्या राज्यातून आपल्याकडे आलेल्या पर्यटकांकडे भीक मागतात, असा प्रश्न उपस्थित करून त्यांना जादा पैसे हवेत असतील तर त्यांच्याकडून जादा वेळ काम करून घ्या, असा सल्ला तेलंगणातील ड्रायव्हर शंकर याने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

याबाबत सोशल मीडियावर श्री. शंकर यांनी व्हिडीओ व्हायरल केला आहे. तेलंगणातील ड्रायव्हरची ही कैफियत अत्यंत बोलकी असून महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावणारी आहे. शंकर यांनी व्हिडीओत म्हटले की, आम्ही इतर राज्यातून धार्मिक पर्यटनासाठी किंवा माल घेऊन महाराष्ट्र राज्यात येत असतो. त्यावेळी आम्ही आमच्या वाहनांची सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवतो.पण आपल्या राज्यात आल्यावर सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही आपले वाहतूक पोलिस गाडी अडवून पैसे मागतात. तुमचे वाहतूक पोलिस भ्रष्टाचार करत आहेत. त्यांना सरकारी नोकरीतून मिळणारे पैसे कमी मिळतात म्हणून आमच्याकडून जबरदस्ती वसुली करत असतात. कधी कधी मारतात ही. या प्रकारामुळे आम्हाला खूप वेदना होतात. आम्ही महाराष्ट्र राज्यात शिर्डी संस्थान, मुंबई, विठ्ठल मंदी, कोल्हापूरची आंबाबाईचे मंदीर पाहण्यासाठी येत असतो.

आम्ही महाराष्ट्रात चांगल्या दृष्टीकोनातून येत असतो. पण तुमच्या वाहतूक पोलिसांचा काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही. बाहेरच्या राज्यातील गाडी दिसली की गाडी अडवून सर्व कागदपत्रे तपासतात. कागदपत्रे पूर्ण असूनही तुम्हाला दंड भरावा लागेल असे सांगतात. कधी सहाशे रूपये भरा, कधी बाराशे रूपये भरा.. असे सांगतात. त्यांचा नेमका काय प्रश्न आहे. काही वेळेस त्यांच्याकडून मारहाणही होते. आम्ही तुमच्या राज्यात येतो त्यावेळी सर्व कागदपत्रे नियमाप्रमाणे पूर्ण ठेवतो. तरीही आम्ही आपल्या वाहतूक पोलिसांना पैसे का म्हणून द्यावेत. पैसे देत नाहीत म्हणून मारतात, अशी तक्रार त्याने केली आहे.

आम्ही भारतीय नागरीक नाही का, आपल्या राज्यात आम्ही येऊ शकत नाही का, असा प्रश्न शंकरने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तुम्ही आमच्या तेलंगणा राज्यात या. येथील ग्रामीण भागात या. येथे सर्वात चांगले प्रशासन आहे. आमच्याकडे रस्ते चांगले आहेत. आमचे वाहतूक पोलिस बाहेरच्या लोकांना चांगली वागणूक देतात. तुम्हाला जरी त्यांनी अडविले तर कागदपत्रे पाहून सोडून देतात. पैशाची भीक कधीच मागत नाहीत. तुमच्याकडे असेच का होत आहे. तुमचा वाहतूक पोलिस भीक का मागतात. मी थोडे जास्तच बोललो आहे, तरीही मला माफ करावे. हवे तर आमच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्री याबाबत चर्चा करून माहिती घ्यावी, असा सल्ला त्याने दिला आहे.

या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणून तुम्ही लक्ष घालावे. आपल्या राज्यात आम्ही येऊन परत गेलो की आम्ही आजारी पडतो. कारण तुमच्या येथील रस्त्यांची खूपच वाईट अवस्था आहे, असाही अनुभव त्याने मांडला आहे. एकूणच या तेलंगणच्या ड्रायव्हरची ही कैफियत अत्यंत बोलकी असून महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावणारी आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख