आदित्य ठाकरे दिवाळीनंतर कासला भेट देणार - Aditya Thackeray to visit Kas after Diwali | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरे दिवाळीनंतर कासला भेट देणार

सुर्यकांत पवार
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

बामणोली- तापोळा येथील बोटिंग व्यवसाय वाढीसाठी उपाययोजना करणे, या गावातील शेतीमाल, कलाकुसर यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हॉटेल व्यवसायाला चालना देणे, या परिसरातील झोनचा प्रश्न सोडवणे आदी बाबींवर सखोल चर्चा झाली

कास : जागतिक पर्यटन स्थळाचा वारसा लाभलेल्या कास, आशिया खंडातील उंच धबधबा वजराई तसेच ठोसेघर या परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावातील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देणार आहे. त्यानंतरच या विभागातील विकास कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील शिष्टमंडळास दिले.

माजी आमदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडुदादा सकपाळ यांच्यासह स्थानिक लोकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील सांगताना दगडुदादा म्हणाले, विविध निसर्ग संपदेनी समृद्ध जिल्हा असून पर्यटनाच्या दृष्टीने म्हणावा तसा विकास झालेला नाही.

जिल्ह्यातील फुलांसाठी प्रसिद्ध जागतिक दर्जाचे कास पठार, आशिया खंडात सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा व परिसरातील विविध पर्यटनस्थळांच्या परिसरातील गावांच्या विकास कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या पर्यटन स्थळांना जाणारे विविध रस्ते दर्जेदार करणे, जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना उत्तामोत्तम सुविधा देणे,सुरक्षणात्मक उपाय म्हणून पोलिस चौक्या बांधणे व स्थानिक नागरिकांना रोजगार व विकासाची संधी उपलब्ध करून देणे.

बामणोली- तापोळा येथील बोटिंग व्यवसाय वाढीसाठी उपाययोजना करणे, या गावातील शेतीमाल, कलाकुसर यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हॉटेल व्यवसायाला चालना देणे, या परिसरातील झोनचा प्रश्न सोडवणे आदी बाबींवर सखोल चर्चा झाली. याप्रसंगी कराड उत्तरचे संपर्कप्रमुख शंकर सकपाळ, रवींद्र मोरे, कोंडीबा शिंदे, जितेंद्र दगडू सकपाळ, नंदकुमार गोरे, प्रदीप कदम, लक्ष्मण आखाडे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जगन्नाथ माने, नामदेव मोरे आदी उपस्थित होते.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख