'किसन वीर'ला कोणीही रोखू शकत नाही : मदन भोसले - 50th season of "Kisan Veer" will be a success Says President Madan Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

'किसन वीर'ला कोणीही रोखू शकत नाही : मदन भोसले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

अडचणी आल्या म्हणून हरणारा मदन भोसले नाही. कोणावरही एक शब्द न बोलता मी माझे काम करतोय. माझं दायित्व फक्त सभासदांशी आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी, सभासदांशिवाय इतरांना उत्तरं देत बसण्यात वेळ खर्ची घालवणार नाही. माझ्या पद्धतीमुळे यंदाचा हंगाम सुरु होण्यात कोणतीही अडचण उरली नाही.

भुईंज (ता. वाई) :  राजकारण आणि सहकार याची कधी गल्लत केली नाही. तरीही अडचणी येत राहिल्या. या अडचणीवर मात करण्याचा पुरुषार्थ दाखवला, त्यापासून मागे हटलो नाही, थांबलो नाही किंवा तसा विचारही मनाला कधी शिवला नाही. याच जिद्दीने आर्थिक प्रश्न निकाली लावण्यात यश येत असून ''किसन वीर'' चा ५० वा गळीत हंगाम यशस्वी होणारच. शेतकऱ्यांनी, कामगारांनी ज्या ताकदीने 'किसन वीर' ची पाठराखण केली. असून 'किसन वीर' च्या या शक्तीला कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केला.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगामाची जय्यत तयारी पुर्णत्वाच्या मार्गावर असून यंदाच्या हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी मदन भोसले बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा उत्तम परिस्थिती होती तेव्हा हातचं राखून न ठेवता एफआरपीपेक्षा ३२५ कोटी रुपये अधिक शेतकऱ्यांना दिले. ते त्यांच्या हक्काचं होतं ही भावना कायम जपली. अपघात विम्यासह, अनुदानाच्या, सवलतीच्या किती योजना राबविल्या त्याची मोजदाद करायची म्हटलं तर वेळ पुरणार नाही.

२० गुंठ्याचा मालक असणारा शेतकरी कोटी सव्वाकोटीच्या ऊस तोडणी यंत्राचा मालक केला. निवडणुकीत कोणी, कुठं काम केलं याची भनकसुद्धा कधी इथल्या कारभारात आणू दिली नाही. मात्र, या गोष्टी काही ठराविक लोक विसरले असले तरी तमाम शेतकरी सभासद व कामगारांनी मात्र, त्याच कामाच्या बळावर पाठबळ वाढवलं. आज दसऱ्यादिवशी सांगतो कोणी कितीही अफवा पसरवू दे त्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांच्या जोरावर शेतकऱ्यांचा कारखाना दणक्यात सुरु होणारच. अडचणी कोणाला येत नाहीत.

अडचणी आल्या म्हणून हरणारा मदन भोसले नाही. कोणावरही एक शब्द न बोलता मी माझे काम करतोय. माझं दायित्व फक्त सभासदांशी आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी, सभासदांशिवाय इतरांना उत्तरं देत बसण्यात वेळ खर्ची घालवणार नाही. माझ्या पद्धतीमुळे यंदाचा हंगाम सुरु होण्यात कोणतीही अडचण उरली नाही. गेली काही वर्ष प्रत्येकवेळी अफवा उठवल्या गेल्या. ज्यांचा या कारखान्याला ऊस नाही,

ज्यांचं काही घेणंदेणं नाही असे यात आघाडीवर. विरोधात आम्हीही होतो पण टिपरं कधी दुसऱ्या कारखान्याला घातलं नाही, कुणाला त्यासाठी उद्युक्त केलं नाही. केवळ सत्तेत असताना बांधिलकी जपणाऱ्यातील मी नव्हे. आजच्या खासगीकरणाच्या रेट्यात शेतकऱ्यांची मालकी मोडीत काढण्याचा घायटा अनेकांना आहे. मी असेपर्यंत ते घडू देणार नाही. पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या बळावर किसन वीरला कोणीही रोखू शकणार नाही, याचाही भोसले यांनी पुनरूच्चार केला.

 यावेळी सभासद मितिन भालेराव भोईटे व सौ. अनिता मितिन भोईटे (मु. पो. वाघोली, ता. कोरेगांव), गजानन बुवासो धायगुडे व सौ. पद्मा गजानन धायगुडे (रा. खेड बु, ता. खंडाळा), रामचंद्र यशवंत पवार व सौ. नंदा रामचंद्र पवार (रा. शेते, ता. जावली), प्रकाश महादेव कदम व सौ. संगिता प्रकाश कदम (रा. बावधन, ता. वाई) व राजेंद्र (बाबुराव) ज्ञानदेव जाधव व सौ. संगिता राजेंद्र जाधव (मु. पो. गोवे, ता. जि. सातारा) यांच्या हस्ते बॉयलर प्रज्वलित करण्यात झाला.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख