`दर वेळी नवा घरोबा शोधणाऱ्या शेट्टींनी स्थिर संसार करावा आणि माझा पिच्छा सोडावा`

शेट्टी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना अंधारात ठेवून रातोरात बारामती गाठतात आणि पवार साहेबांच्या बंगल्यात खाली मान घालून आमरसपुरी खाताना दिसतात. स्वाभिमानीतील जिवाभावाच्या सोबत्याना डावलणाऱ्यांवर पदासाठी लाचार झाले, अशी साधी राजकीय टीकाटिप्पणी मी केल्यावर मात्र त्यांच्यासह त्यांच्या ट्रोलर्सांचा भडका उडाला. पण सत्य कटू असते याला मी काय करू, असा सवाल खोत यांनी विचारला आहे.
sadabhau khot- raju shetty
sadabhau khot- raju shetty

पुणे : गावगाड्यातील ग्रामीण बोलीभाषेचा वापर करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या भाषणातून येणारी बोलीभाषेतील उदाहरणे सहजपणे येतात. पण ती उच्चारण्याआधी मी दहादा विचार करतो. कारण शस्रापेक्षा शब्दाचा वार खोलवर रुततो याचे मला चांगले भान आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या प्रस्थापितावर हल्ला करतानाही मी कधी राजकीय फायद्यातोट्याचा विचार केला नाही, असा दावा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.

माजी खासदार राजू शेट्टी आणि खोत यांच्यात सध्या खटके उडत आहेत. शेट्टी यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल खोत यांचा तोल सुटल्याचे बोलण्यात येत आहेत. त्यावर खोत यांनी आपली बाजू मांडली आहे. माध्यमांतील लोकांवरही खोत यांनी वैताग काढला आहे.

माध्यमांच्या लोकांना पांढऱ्यावरती काळे करणारे, असे म्हणत हे कलमकसाई कधी एखाद्याचा बळी घेतील हे सांगता येत नाही. निंदा करून पोट भरायचा धंदा करणे हा या बुद्धिजीवी मंडळींचा आवडता व्यवसाय. अलीकडच्या काळात हे लेखणीसम्राट समोर आले तर त्यांना बरे वाटावे म्हणून मी गोड गोड बोलतो. पण मनात मात्र कधी एकदा ही साडेसाती जाईल असे वाटते. आता या उपद्रवी बुद्धिजिवींबद्दल लिहावे की नको असे वाटते, असे खोत यांनी म्हटले आहे.  

राजू शेट्टी यांनीही मला वेगवेगळ्या पदव्या देण्याचा सपाटा लावला आहे. मुलाखत घेणाऱ्याच दांडक दिसले की कधी एकदा सदाभाऊ वर गरळ ओकतो अशी भावना दाटून येते. खरेतर त्यांच्या आणि माझ्या राजकीय वाटा वेगळ्या होवून आता तीन वर्षे होत आली. तरीही वरचेवर माझी आठवण येवून ते स्फुंदत असतात. बरे आम्ही काय एकदम वेगळे झालो नाही. चौकशी समिती बसवून मला त्यांनी स्वाभिमानीतील जीवाभावाच्या सहकार्यापासून तोडले. मी वेगळी राजकीय चूल मांडली. दुसरी संघटना काढून मार्गक्रमण करू लागलो. दरवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वळचणीला जावून नवनवा घरोबा शोधणाऱ्या शेट्टींनी त्या ठिकाणी तरी स्थिर राहून संसार करावा. पण त्यांची अवस्था आचार्य अत्रे यांच्या"तो मी नव्हेच" या अजरामर नाटकासारखी झाली आहे, अशी टीका त्यांनी केली..

शेट्टी यांची घसरलेली जीभ दिसली नाही का?

भाजप हा जातीयवादी पक्ष आहे म्हणून शरद जोशी यांना रोखायचे. आपण मात्र मला तुमच्या पदरात घ्या म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या पाया पडायचे, शेट्टी साहेबांनी एकाही सभेत पवारांवर टीका करायची संधी सोडली नाही, असा दावा खोत यांनी केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, केंद्रात वेगवेगळ्या खात्यांचे अनुभवी मंत्री आणि माध्यमातून ज्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चिले जाते त्या पवार साहेबांची भरसभेत पापी म्हणून हेटाळणी होत असेल तर माझ्या सारख्या गावगाड्यातील कार्यकर्त्यावर त्यांनी दुगाण्या झाडल्या तर नवल नाही. पवार यांच्यावर चिखलफेक करताना एकाही बुद्धिवाद्याला शेट्टी यांची जीभ घसरलेली दिसली नसेल काय, असा सवाल खोत यांनी विचारला.

उठताबसता पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका करणारे हेच शेट्टी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना अंधारात ठेवून रातोरात बारामती गाठतात आणि पवार साहेबांच्या बंगल्यात खाली मान घालून आमरसपुरी खाताना दिसतात. स्वाभिमानीतील जिवाभावाच्या सोबत्याना डावलणाऱ्यांवर मी पदासाठी लाचार झालो, अशी साधी राजकीय टीकाटिप्पणी केल्यावर मात्र त्यांच्यासह त्यांच्या ट्रोलर्सांचा भडका उडाला. पण सत्य कटू असते याला मी काय करू? सत्याचा हा कडू घोट पचवूनच राजकीय वाटचाल करावी लागते, हे चमच्यांनी लक्षात घ्यावे. बराच काळ पद भोगलेली राजकीय व्यक्ती पद नसल्याने बेचैन होते हे अनेकाबाबतीत जवळून बघितले आहे. पण बहुसंख्य राजकीय नेते निवडणुकीतील अपयश पचवून नव्याने आव्हानांना सामोरे जाताना दिसले. ते काही आपल्या प्रतिस्पर्ध्यावर उठसूठ राजकीय फुत्कार टाकत बसले नाहीत. पण हातकणंगलेचा पराभव मात्र शेट्टी यांच्या मनात खोलवर रुतून बसला आहे. या पराभवात माझा निमित्त मात्र वाटा आहे. त्यांनी राजकीय रंगमंचावर केलेल्या फसवाफसवीच्या खेळाला लोकन्यायालयात मिळालेली ती लोकशाहीतील शिक्षा आहे. सरकारी वकीलाप्रमाणे मी फक्त त्यांच्यावरील आरोपपत्राचे माझ्या बोलीभाषेत वाचन केले. पाच वर्षांसाठी पदापासून दूर ठेवण्याची शिक्षा ( फैसला) जनतेने दिला आहे. आता हे कोणाला आवडो अथवा न आवडो लोकशाहीत मला जनतेची वकिली करावीच लागते. यामुळे संतापाने त्यांच्या अंगांचा तिळपापड होतो. `उल्टा चोर कोतवाल को डांटे` या उक्तीप्रमाणे शिक्षा झालेला आरोपीच वकीलावरच घसरू लागला तर काय म्हणावे, असे खोत यांनी म्हटले आहे.

सोलापूरात नक्की काय घडले?

दूध आंदोलनाच्या निमित्ताने एक आॅगस्टला सोलापुरात होतो. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत या भागात दूध उत्पादकांची अधिक लूट होत असल्याने रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी मला या भागात बोलावले होते. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावातील लोकांच्या निमंत्रणावरून मी तिथे गेलो होतो. तिथून मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे आलो. साहजिकच पत्रकार आले. दूध आंदोलनावर बोला म्हणू लागले.मी म्हटले सकाळी या विषयावर बोललो आहे. आता जरा निवांत बसतो. इतक्यात एका पत्रकार मित्राने तुमच्यावर कोंबडी चोर म्हणून आरोप केलाय म्हणून व्हीडिओ क्लिप दाखवली. पदासाठी दारोदारी हिंडणाऱ्या राजकारणावरच्या फिरत्या रंगमंचावरील या बहुगुणी नेत्याला प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. मी देखील वास्तवदर्शी मुलाखत दिल्याचे खोतांनी सांगितले.

वास्तवाचे चटके बसल्यावर आरोळ्या उठू लागल्या. दरबारातील हुजरे फेर धरून नाचू लागले. सदाभाऊंची जीभ घसरली असे मथळे फिरु लागले. सोशल मिडियातील शेणामुतातील किडे वळवळू लागले. माझ्या नावाने शिमगा करून पोळ्या लाटण्याचा पोटभरू कार्यक्रम झाला. आता हे मला काही नवीन नाही. गेले ३ वर्षे काही कार्यकर्ते हा चिखलखाना चालवत आहेत. शेट्टी साहेबांच्या या खेळातील काही माहीर साथीदार त्यांना सोडून गेले. काही नव्याने राहुटी ठोकून नव्या दमाने चिखलफेक करताहेत. तो त्यांचा पोटापाण्याचा धंदा आहे. मला व्यक्तीश: त्यांच्या बद्दल सहानुभूती वाटते. कारण कोरोनाच्या काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत.त्यां चा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. माझ्यावर चिखलफेक करण्याचा रोजगार मिळवून शेट्टीच्या लुटीवर हात मारत चरितार्थ चालत असेल तर त्यांनी मला मनसोक्त शिव्या घालाव्यात. उलट खूष होऊन माजी खासदार त्यांची बिदागी वाढवेल आणि मला त्यांचे पुण्य लाभेल, असा टोला लगावला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com