खळबळजनक : सेना आमदार कदमांचा खासदार तटकरेंविरोधात हक्कभंग ठराव - sena mla yogesh kadam files privilege motion against mp tatkare | Politics Marathi News - Sarkarnama

खळबळजनक : सेना आमदार कदमांचा खासदार तटकरेंविरोधात हक्कभंग ठराव

चंद्रशेखर जोशी
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

सेनेच्या आमदाराची राष्ट्रवादीच्या खासदाराच्या विरोधात भूमिका

दापोली : खासदाराच्या विरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा प्रकार राज्यात पहिल्यांदाच होत आहे. विशेष म्हणजे महाआघाडीतील मित्रपक्षांचे आमदार व खासदार या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमीपुजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. तसेच आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करत असल्याचे कारण देत दापोली विधानसभा मतदासंघाचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

योगेश कदम म्हणतात की सुनील तटकरे हे सातत्याने माझ्या दापोली विधानसभा मतदारसंघात मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत आहेत. 12 ऑक्टोबर रोजी मला निमंत्रण न देता त्यांनी दापोली येथील पंचायत समिती सभागृहात शासकीय अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली.  रायगड व रत्नागिरी जिल्हे जोडणारा आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरून जड वाहने नेण्यास मनाई करण्यात आली असल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी आपण प्रयत्न केले तर राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही संबंधित अधिकार्‍यांच्या या पुलासंदर्भात बैठका घेतल्या होत्या. त्यावरूनही आमदार कदम चिडले आहेत

म्हाप्रळ ते आंबेत दरम्यान फेरी बोट सेवा सुरू करण्यासाठी दोन्ही बाजूला फेरीबोट लावण्यात येणार आहे. या जेटीचे बांधकाम करण्यासाठी  शासनाकडून निधीही मंजूर झाला. या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्याअगोदरच सुनील तटकरे, त्यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे व माजी आमदार संजय कदम यांना घेऊन या कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचे मला निमंत्रणही देण्यात आले नाही. तसेच या भूमिपूजनाच्या पाटीवर माझे नाव न टाकता खासदार महोदयांनी राष्ट्रवादी पक्षाचाच भूमिपूजन कार्यक्रम केला आहे, असा आरोप कदमांनी केला.

ही बाब अतिशय गंभीर असून माझ्या हक्कावर गदा आणण्याचे काम सातत्याने तटकरे करत आहेत. त्यामुळे नाइलाजाने आपण 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.  सुनील तटकरे यांच्यावर पुढील योग्य कारवाई करण्याची विनंती केली असल्याची माहिती कदम यांनी दिली. या सर्व प्रकारामुळे आता महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे. आता दोन्ही पक्षाचे नेते या संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तटकरे यांनी दापोली पंचायत समितीत 12 ऑक्टोबर रोजी बैठक घेतली होती. या बैठकीसाठी आमदार योगेश कदम का  उपस्थित का नाहीत, अशी विचारणा केली असता ते पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या बैठकीला आले नसल्याचे तटकरे यांनी तेव्हा पत्रकारांना सांगितले होते. तसेच जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर तिन्ही राजकीय पक्षांमध्ये समन्वय होईल या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे. तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींना तसेच पक्षाच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेत कामे मार्गी कशी लावायची, हे येत्या काही दिवसातं ठरविण्यात येईल, असे वक्तव्य तेव्हा तटकरे यांनी केले होते. मात्र ते ठरायच्या आधीच कदमांनी आपला बाण सोडला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख