पोलिसांनी पंधरा दिवस सांगली जिल्ह्यात शोध घेतला...पण `महाराष्ट्र केसरी` चंद्रहार या गावात सापडला - sangali police nabs Maharashtra Kesari Sanjay Patil in this village | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांनी पंधरा दिवस सांगली जिल्ह्यात शोध घेतला...पण `महाराष्ट्र केसरी` चंद्रहार या गावात सापडला

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 17 मे 2020

महसूल कर्मचाऱ्यांनी चंद्रहार पाटील याला अटक करण्यासाठी आक्रमक रुप धारण केले होते. 

विटा : वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा, या कारणावरून तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना मारहाण करणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला आज दुपारी चारच्या सुमारास "एलसीबी' च्या पोलिस पथकाने दिघंची (ता. आटपाडी) येथील हॉटेल अथर्व समोर सापळा रचून पकडले. तसेच त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे (वय 19 , कंडारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) याला देखील अटक केली. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी ही माहिती दिली.

तीन मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास चंद्रहार पाटील आणि साथीदार सागर सुरवसे याने तहसीलदार शेळके यांना वाळूच्या वाहनांवर केलेल्या कारवाईचा रोष मनात ठेवून व वाहनांना केलेला दंड रद्द करून वाहने सोडावीत यासाठी तहसील कार्यालयाच्या पोर्चमध्ये शेळके त्यांच्या शासकीय गाडीत बसत असताना अडवले. त्यांना गाडीच्या बाहेर ओढून मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर चंद्रहार पाटील व सागर पळून गेले होते.

त्यांच्या शोधासाठी तीन पथके कार्यरत केली होती. ते दोघे पसार झाल्यापासून त्यांचा पथके शोध घेत होती. पोलिसांनी क-हाड, सुर्ली, आटके, तासगांव, कुंडल व भाळवणी व परिसरात त्यांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत.

आटपाडी तालुक्‍यातील दिघंची येथे चंद्रहार येणार असल्याची माहिती "एलसीबी' च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आज दुपारी चारच्या सुमारास हॉटेल अथर्वसमोर त्यास पकडण्यात आले. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, प्रदीप चौधरी आणि पथकाने कामगिरी केली.

चंद्रहारला अटक करावी, यासाठी जिल्ह्यातील महसूलच्या अधिका-यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना त्याचे निवेदन देण्यात आले होते. अखेर पंधरा दिवसांनी चंद्रहारला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख