तळीयेचे पुनर्वसन करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे सरसावले..
Mp Chatrapati Sambhajiraje Bhosle News Aurangabad

तळीयेचे पुनर्वसन करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे सरसावले..

अतिवृष्टीमुळे झालेल्या या दुर्घटनेत तळीये गाव पूर्णतः विस्थापित झाले असून या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी 'म्हाडा' तयार आहे.

कोल्हापूर ः  रायगड जिल्ह्यातील महाड व त्या लगतच्या तीस गांवासह तळीये येथील पुरग्रस्त भागाला नुकतीच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील परिस्थिती पाहून त्यांचे मन हेलावले. या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी या गावांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. (Chhatrapati Sambhaji Raje rushed to rehabilitate the taliey Village.) या संदर्भात आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट व्हायरल करत त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणतात, रायगड जिल्ह्यातील महाड, महाडलगतची तीस गावे व तळीये येथील पूर व दुर्घटनाग्रस्त ठिकाणांना भेट दिली. तळीये या गावी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे ८० जण मृत्यूमुखी पडले आहेत. (Bjp Mp Chatrapati Sambhaji Raje, Kolhapur) या मृतात्म्यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली वाहिली. यावेळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, विकास भरतशेठ गोगावले, तळीये गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या या दुर्घटनेत तळीये गाव पूर्णतः विस्थापित झाले असून या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी 'म्हाडा' तयार आहे.  मात्र, तळीये गावाच्या जवळपास शासनाकडे तूर्तास यासाठी योग्य जमीन उपलब्ध नसल्याचे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मला सांगितले. रायगड विकास प्राधिकरणाकडे दुर्गराज रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे ८० एकर जमीन संपादित केलेली असून याठिकाणी प्राधिकरणामार्फत शिवकालीन वस्तुसंग्रहालये व माहिती व इतिहास संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

रायगड प्राधिकरण देणार जागा..

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क करून रायगड प्राधिकरणाच्या या ८० एकर जागेपैकी तीन एकर जागा तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच या गावाचे पुनर्वसन करीत असताना येथील घरांची रचना ऐतिहासिक शिवकालीन धाटणीने करून, स्थानिक संस्कृतीचे पुनरूज्जीवन करून या गावास जागतिक दर्जाच्या पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना मांडली.

यामाध्यमातून पुनर्वसनाबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून या ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होईल. यावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका दर्शवली असून, रायगड विकास प्राधिकरण व म्हाडाच्या संयुक्त विद्यमातून अशा पद्धतीने तळीये गावाचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्नशील राहू, असे सांगितले. 

याविषयी तळीये ग्रामस्थांशी चर्चा केली असता ग्रामस्थ यासाठी तयार आहेत. मात्र, तळीये ते पाचाड जवळपास ४० किमीचे अंतर पाहता शेतीसाठी येणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या. यावर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तळीये येथील शेतजमिनी शासनाच्या ताब्यात घेऊन तितक्याच क्षेत्राच्या शेतजमिनी पाचाड भागात देण्याबाबत प्रयत्न करू, असे सांगितले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in