Chandrakantdada did not even come to see whether the people of Kolhapur lived or died: Mushrif | Sarkarnama

कोल्हापुरची जनता जगली की मेली हे पहायलासुद्धा चंद्रकांतदादा आले नाहीत ः मुश्रीफ

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 मे 2020

सत्ता असताना वारंवार कोल्हापुरला येवून ते लक्ष्मीदर्शन करत होते. आताही त्यांनी लक्ष्मीदर्शन केले असते, तर गरीबांना फार बरे झाले असते.

कोल्हापूर : `` कोरोनामुळे या 50 दिवसांत कोल्हापुरची जनता जगली की मेली, हे पहायला देखील चंद्रकांतदादा आलेले नाहीत. सत्ता असताना वारंवार कोल्हापुरला येवून ते लक्ष्मीदर्शन करत होते. तसेच त्यांनी गोरगरीबांना काही लक्ष्मीदर्शन करता आले, तर तेही करावे,`` असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

मुश्रीफ म्हणाले, ``चंद्रकांतदादांना कोल्हापुरकरांनी भरभरुन दिले. मोठे केले. पदवीधरच्या जागेवर त्यांना दोनदा निवडून दिले. ते मंत्री झाले. मात्र आता कोरोनाचे संकट आले आहे. कोरोनामुळे या 50 दिवसांत कोल्हापुरची जनता जगली की मेली, हे पहायला देखील चंद्रकांतदादा आलेले नाहीत. सत्ता असताना वारंवार कोल्हापुरला येवून ते लक्ष्मीदर्शन करत होते. आताही त्यांनी लक्ष्मीदर्शन केले असते, तर गरीबांना फार बरे झाले असते. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, त्यांना कोल्हापुरात येण्यास काही बंदी नाही. ते मुंबईला जावू शकतात, तसेच ते कोल्हापुरला येवू शकतात. त्यांना सुरक्षा व्यवस्था आहे. पास मिळू शकतात. त्यामुळे त्यांनी कोल्हापुरात यावे. आम्ही जे कोरोनाविरुध्द काम सुरु केले आहे, ते पहावे. कागलपासून त्यांनी हे काम पहावे. हे काम पाहिल्यानंतर त्यांना समाधान होईल.``

कोल्हापुरातील लोकांना नाउमेद करू नये

कोल्हापुरात तीन-तीन महिन्यांचा महापौर असतो, असे वक्‍तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. वास्तविक त्यांनी ज्यांच्यासोबत आघाडी केली आहे, त्या सहकाऱ्यांनीची ही पध्दत आणली आहे. सगळयांना संधी मिळावी, हा त्यामागचा प्रयत्न असतो. मात्र अशा प्रकारे कोल्हापुरचे नाव घेवून येथील लोकांना नाउमेद करण्याची आवश्‍यकता नव्हती, असे मुश्रीफ म्हणाले.

 जनावरांचा चंद्रकांतदादाला शाप

सत्ता असती तर चांगले काम केले असते, या चंद्रकांतदादांच्या वक्‍तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, गतवर्षी चिखलीत महापूर आला, तेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे महाजनादेश यात्रेत गुंतले होते. आम्ही त्यांना यात्रा थांबवून जिल्ह्यात येण्याचे आवाहन केले. तरीही ते बऱ्याच दिवसांनी कोल्हापुरात आले. आल्यावर त्यांची कशी टर उडवली, सांगली व कोल्हापुरातून त्यांनी कसा काढता पाय घेतला, हे सर्वश्रुत असल्याचे सांगत महापुरात दगावलेल्या जनावरांचाच त्यांना शाप लागला, असा टोलाही मुश्रीफ यांनी लावला.

भाजपातच भूकंप झाला
राजू शेटटींनी सांगितल्याने पुण्यातून निवडणूक लढलो, नाहीतर कोल्हापुरातून कोणत्याही मतदार संघातून निवडून आलो असतो, असे वक्‍तव्य चंद्रकांतदादांनी केले होते, याबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी यावर मिश्‍किल हास्य केले. भाजपसारखा पक्ष आज देशात सत्तेत आहे, मात्र कोल्हापुरात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा काय म्हणतात, त्याला मी गांभीर्याने घेत नाही. त्यांना असे बोलायची सवय आहे. बऱ्याचवेळा त्यांनी भूकंप होणार असल्याची घोषणा केली. मात्र आज याच पक्षात भूकंप असल्याचा टोला त्यांनी लगावला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख