Take care of Tamasha artists, playwrights, help them financially Says MP Udyanraje Bhosale | Sarkarnama

तमाशा कलावंत, नाट्यकर्मीचे हाल बघवेणात, त्यांना आर्थिक मदत करा : उदयनराजे 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 1 जुलै 2020

सिनेमा आणि मालिकांना शासनाने चित्रीकरणाची परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे नाटकांचे प्रयोग, तमाशाबारी आणि ग्रंथालये सुरु करण्यास विशेष दक्षता घेवून परवानगी देणेबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जेणे करून नाट्यकलावंतांसह्र सर्व घटकांना दिलासा मिळेल.

सातारा : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे नाट्यकर्मी, तमाशा कलावंतांचे हाल बघवेणात झाले आहेत. शासनाने अशा घटकांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. सिनेमा आणि
मालिकांना चित्रीकरणाची शासनाने परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे तमाशा बारी, नाटकांचे प्रयोग सुरु करण्यास विशेष दक्षता घेऊन परवानगी द्यावी, अशी मागणी साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष पत्राव्दारे केली आहे. 

उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले की, राज्य शासन ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या पात्रता श्रेणीनुसार ठराविक मानधन प्रदान करीत असते. तथापि कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित ज्येष्ठ कलाकारांना मातीन ते चार महिने मानधन मिळालेले नाही. मुळातच कलाकारांना तोकडे मानधन असून मावळतीचा सूर्य बघत असलेल्या ज्येष्ठ कलाकारांना या मानधनाचा मोठा आधार आहे.

मागील तीन ते चार महिन्यांचे मानधन एकरकमी राज्यभरातील सर्व संबंधितांना
तातडीने प्रदान करण्याची कार्यवाही करावी. राज्यातील नाट्यगृहे, ग्रंथालये ही गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे नाट्यकलाकार तसेच नाट्य कंपनीवर अवलंबुन असलेल्या सर्वावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील बहुतेक सर्व व्यवहार टप्याटप्याने सुरु करण्यात येत आहेत.

यामध्ये सिनेमा आणि मालिकांना शासनाने चित्रीकरणाची परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे नाटकांचे प्रयोग, तमाशाबारी आणि ग्रंथालये सुरु करण्यास विशेष दक्षता घेवून परवानगी देणेबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जेणे करून नाट्यकलावंतांसह्र सर्व घटकांना दिलासा मिळेल. तसेच तमाशा-बारी कलावंतांचे सध्या अतोनात हाल होत आहेत. पूर्वी या कलावंतांना राजाश्रय होता. सध्याच्या काळात लोकाश्रयावर या घटकाचे जीवन कसे बसे सुरू आहे. 

परंतु लॉकडाउनमुळे त्यांच्या व्यावसायिक कलेवर बंदी आल्याने अशा घटकांना शासनाने तातडीने मदत करणे आवश्‍यक आहे. अन्यथा या लोककलाकारांवर कठीण प्रसंग ओढावण्याची शक्‍यता आहे. शासनाने तातडीने सर्व कलाकारांना आवश्‍यक ती आर्थिक मदत करावी. याबाबत उदयनराजे भोसले यांनी तीन  स्वतंत्र पत्रे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविली आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख