यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी मानले अजित पवारांचे आभार

राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजूरी देवून यासाठी आवश्यक असलेल्या 75 लाख 46 हजार 186 इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी व जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजूरी दिली आहे.
 Shivendraraje has thanked Ajit Pawar.
Shivendraraje has thanked Ajit Pawar.

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळत आहेत. कोरोनाची चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाला पुण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरु करावे, अशी मागणी भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. श्री. पवार यांनी १० दिवसातच हा प्रश्न मार्गी लावून जिल्ह्याची मोठी गैरसोय दूर केली आहे. कोरोना चाचणी सेंटरमुळे रुग्णांवरील उपचाराला गती मिळेल असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे २७ जूनला सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. शासकीय विश्राम गृहात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती. त्यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर आवश्यक असून ते सुरु करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

तशा आशयाचे निवेदनही त्यांनी श्री. पवार यांना दिले होते. पुणे आणि मुंबईवरुन असंख्य लोक जिल्ह्यात त्यांच्या मूळगावी परतले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सातारा शहरातही रुग्ण आढळून येत असून कोरोना चाचणीसाठी रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठवले जातात. रुग्ण बाधित आहे की अबाधित याचा अहवाल पुण्यावरून यायला दोन ते तीन दिवस लागतात.

त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार सुरु होण्यासाठी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम
आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी साताऱ्यातच कोरोना चाचणी सेंटर असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी सेंटर तातडीने सुरु करावे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. त्यावेळीच अजित पवार यांनी याबाबत त्वरित निर्णय घेऊ असा  शब्द शिवेंद्रसिंहराजे यांना दिला होता.

त्यानंतर दहा दिवसांतच अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून कोरोना चाचणी सेंटरला मंजुरी दिली. अजित पवार यांच्या सूचनेनुसार राज्य शासनाने साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजूरी देवून यासाठी आवश्यक असलेल्या 75 लाख 46 हजार 186 इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी व जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजूरी दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामग्री ई-टेंडर ऐवजी शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्याकडील 18 एप्रिलच्या पुरवठा आदेशानुसार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

तसेच लागणारे आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ व त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उपलब्ध निधीतून करण्यासही मान्यता दिली आहे. जिल्ह्यात येणारी बहुतांश कुटुंबे ही कंन्टेन्मेंट, हॉटस्पॉट व रेड झोनमधील असल्याने या सर्व नागरिकांत लक्षणे दिसत असल्यास कोरोना तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे. तपासणीसाठी व अहवाल प्राप्तीसाठी लागणारा कालावधी बघता प्रशासकीय यंत्रणेवर ताण
येत होता.

मोठ्या प्रमाणावर खर्चही होत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालयात आरटी पीसीआर लॅब सुरू करावी अशी मागणी केली होती. त्यास मान्यता मिळाल्याने आरोग्य यंत्रणा आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी
जिल्हावासियांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com