जलसंपदाच्या प्रकल्पांसाठी कर्जाची आवश्यकता नाही : जयंत पाटील

जिल्ह्यातील प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला असून त्यासाठीही निधी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे सध्या दिलेल्या 70 एकर जागेच्या बदल्यात खावली येथील महसूल विभागाची जागा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत केली जाणार आहे.
Minister Jayant Patil
Minister Jayant Patil

सातारा : कोरोनामुळे जलसंपदाच्या निधीस कात्री लागली असली तरी केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी या दोन योजनांतून निधी उपलब्ध होत आहे. यामुळे पाटबंधारे प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. यासाठी राज्य शासनाला कोणतेही कर्ज काढण्याची आवश्‍यकता नाही, असे स्पष्ट मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

 साताऱ्यातील मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटला असून त्या जागेच्या बदल्यात खावलीची जागा पाटबंधारेला परत घेणार असून त्यावर पाटबंधारे विभागाची कार्यालये स्थलांतरीत केली जातील, असे त्यांनी सांगितले. 

कृष्णा खोऱ्याची साताऱ्यातील जमीन मेडिकल कॉलेजला दिलेल्या जमिनीच्या बदल्यात खावली येथील महसूल विभागाची जमीन कृष्णा खोऱ्याकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. या जमिनीची पहाणी, जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज इस्लामपूरकडे जाताना साताऱ्यात थांबले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. 

जयंत पाटील म्हणाले, त्या दिवशी रात्री उशीरा बैठकीसाठी आल्यामुळे सातारा मेडिकल कॉलेजला कोणती जागा दिली आणि त्याबदल्यात पाटबंधारे विभागाला महसूल विभागाकडून खावलीची कोणती जागा मिळणार होती. याची पहाणी करण्याचे राहिले होते. आज आम्ही या दोन्ही जागांची पहाणी केली. तसेच जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला.

कोरोनामुळे जलसंपदा विभागाच्या निधीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामांसाठी सरकारला कर्ज काढावे लागेल का, या प्रश्‍नावर श्री. पाटील म्हणाले, सध्या तरी नाही. कारण केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेतून पाटबंधारे प्रकल्पांना निधी मिळत असल्याने या प्रकल्पांची कामे मार्गी लावता येणार आहेत.

जिल्ह्यातील प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला असून त्यासाठीही निधी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.  सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे सध्या दिलेल्या 70 एकर जागेच्या बदल्यात खावली येथील महसूल विभागाची जागा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत केली जाणार आहे.

या दोन्ही जागांची मी आज पहाणी केली. मेडिकल कॉलेजसाठी दिलेल्या जागेवर पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे व कार्यशाळा ही जलसंपदा विभागाची कार्यालये आहेत. ही कार्यालये आता खावली येथील जागेत स्थलांतरीत करावी लागणार आहेत. या कार्यालयांच्या इमारतींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याची माहिती घेतल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

खड्डा कि डबके.... 
आढावा बैठक संपल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांना अधिकाऱ्यांनी साहेब झाडे लावायची आहेत, असे सांगितले. त्यानुसार श्री. पाटील खड्डा खोदलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी खड्ड्यात झाड लावले. पण झाडासाठी खोदलेला खड्डा पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले. हा नेमका झाड लावायलाच खोदलेला खड्डा आहे ना. पाणी साठणाऱ्या डबक्‍यात झाड लावायला सांगत नाही ना, असा प्रश्‍न जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर एकच हशा पिकला. पण अधिकाऱ्यांनीही नाही, झाड लावायलाच खड्डा खोदल्याचे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com