Modi does not listen to 200 ambassadors and 50 secretaries Says Congress Leader Prithviraj Chavan | Sarkarnama

दोनशे राजदूत, पन्नास सचिवांचेही मोदी ऐकत नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 जून 2020

1947 मध्ये नेहरूंच्या काळात पाकिस्तानचे शरणार्थी आपल्याकडे आले होते. त्यावेळी त्यांच्यासाठी पीएम राष्ट्रीय रिलिफ फंड हा निधी काढण्यात आला होता. तो निधी अजूनही चालू आहे. जी मदत या फंडाला दिली जाते. यापूर्वी पंतप्रधान वाजपेयी होते, मोरारजी देसाई होते, चंद्रशेखर होते, या कोणालाही आपल्या नावाने फंड काढावा असे वाटले नव्हते. मग मोदींना का वाटतो.

सातारा : सर्वच पातळीवर केंद्रातील सरकार नेतृत्वहिन झाले असून त्यांचे हातपाय गळालेले आहेत. त्यामुळेच चीन सारखा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परराष्ट्र धोरणात कोणी कायम स्वरूपी शत्रू व मित्र नसतो. देशाचे हितसंबंध महत्वाचे असतात. परराष्ट्र मंत्रालयात हजारोंवर नोकरशाहा आहेत. यामध्ये दोनशे राजदूत, पाच पन्नास सचिव आहेत. त्यांचेही मोदी एकत नाहीत. अशा पध्दतीने देशाचे परराष्ट्र धोरण राबवत असाल तर देशाची सुरक्षितता कोणाच्या हातात, असा प्रश्‍न काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. 

चीनच्या प्रश्‍नावर विरोधी पक्ष म्हणून आम्हाला उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी आमची भुमिका आहे. पण मोदींकडून योग्य उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही चीनप्रश्‍नी विचारणारच, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोणाच्याही व्यक्तीगत मैत्रीवर परराष्ट्र धोरण ठरत नाही. मोदींना वाटते की शपथविधीला सगळ्यांना बोलावले की सगळे झाले. नवाज शरिफ यांच्या वाढदिवस व लग्नाला गेले की भारत पाक प्रश्‍न सुटेल. तेथे गेल्यानंतर काय झाले, असा प्रश्‍न उपस्थित केला,

श्री. चव्हाण म्हणाले, चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना मोदी स्वत: तब्बल 19 वेळा भेटले होते. भारताच्या इतिहासात कुठलाही पंतप्रधान चीनच्या पंतप्रधानांना इतक्‍यावेळा भेटलेला नाही. कदाचित औपचारिक दोन, तिनदा भेटी झाल्या असतील. तब्बल 19 वेळा भेटले काय झाले वैयक्तिक मैत्रीतून त्यांना अहमदाबादला झोपाळ्यावर खेळविले. ते ही लोक चांगली वागणूक मिळाल्याने खुश झाले. अशातून परराष्ट्र धोरण ठरत नाही.

परराष्ट्र धोरणात कोणीही कायम स्वरूपी शत्रू व मित्र नसतो. येथे देशाचे हितसंबंध महत्वाचे असतात. परराष्ट्र मंत्रालयात हजारोंवर नोकरशाहा आहेत. यामध्ये दोनशे राजदूत, पाच पन्नास सचिव आहेत. त्यांचे ही मोदी एकत नाहीत, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत मोदींनी एक वाक्‍य उच्चारले होते. आमच्या सरहद्दीत चीनी सैनिक घुसलेले नाहीत. आमचे कुठलेही ठाणे त्यांनी
काबिज केलेले नाहीत, असे मोदींनी सांगितले.

मग लढाई झाली कुठे, या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे सांगून श्री. चव्हाण
म्हणाले, याबाबत परराष्ट्र मंत्रांलयात बैठक झाली मग असे काहीही झालेले नाही, मग सारवा सारव सुरू झाली. अशा पध्दतीने परराष्ट्र धोरण केंद्र सरकार राबवत असेल तर देशाची सुरक्षितता कोणाच्या हातात आहे, असा प्रश्‍न श्री. चव्हाण यांनी उपस्थित केला. 

चीनकडून पंतप्रधानांना डोनेशन मिळाल्याचा आरोप मंत्री थोरात यांनी केला आहे, याबाबत विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले, पीएमना व्यक्तीगत डोनेशन मिळाले की त्यांच्या नावाने असलेल्या फंडाला मिळाले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कोरोनाकरिता दिले की आणखी कशासाठी याची माहिती घेतली पाहिजे.

आमचा आक्षेप आहे की, 1947 मध्ये नेहरूंच्या काळात पाकिस्तानचे शरणार्थी
आपल्याकडे आले होते. त्यावेळी त्यांच्यासाठी पीएम राष्ट्रीय रिलिफ फंड हा निधी काढण्यात आला होता. तो निधी अजूनही चालू आहे. जी मदत या फंडाला दिली जाते. यापूर्वी पंतप्रधान वाजपेयी होते, मोरारजी देसाई होते, चंद्रशेखर होते, या कोणालाही आपल्या नावाने फंड काढावा असे वाटले नव्हते. मग मोदींना का वाटतो.

तेही असू देत त्यांचे विश्‍वस्त कोण, तो खर्च कोण करते, ते पारदर्शकपणे पुढे का येत नाही. यासाठीच आम्ही प्रश्‍न उपस्थित करत आहोत, असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी चीनप्रश्नी कोणीही राजकारण करू नये. हा राजकारणापलिकडचा प्रश्न आहे, असा सल्ला दिला आहे. त्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. चीनप्रश्नी आम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत प्रश्न करणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख