If Sanjeev Raje is given a chance in the Legislative Council, he will seize the opportunity Says Shivrupraje Khardekar | Sarkarnama

संजीवराजेंना ही संधी दिल्यास ते सोने करतील : शिवरूपराजे खर्डेकर 

किरण बोळे
सोमवार, 29 जून 2020

संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानसभा किंवा लोकसभेवर मतदारांनी निश्चित मोठया मताधिक्याने निवडून दिले असते, मात्र इतकी लोकप्रियता लाभलेल्या संजीवराजे यांनी ती संधी पक्षाकडे कधीही मागितली नाही, अन्यथा माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या हातून गेला नसता.

फलटण शहर : फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सतत संपर्कात राहुन त्यांच्या प्रश्नांची मांडणी करुन ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी. त्यांनी आजपर्यंत पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर काम केले आहे. या पदांच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या हिताची कामे व निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्यांना संधी मिळाल्यास या संधीचे ते सोने करतील, असा विश्वास फलटण पंचायत समिती सभापती शिवरुपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.

शिवरुपराजे खर्डेकर म्हणाले, प्रचंड लोकप्रियता लाभलेले बहुआयमी नेतृत्व संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानसभा किंवा लोकसभेवर मतदारांनी निश्चित मोठया मताधिक्याने निवडून दिले असते, मात्र इतकी लोकप्रियता लाभलेल्या संजीवराजे यांनी ती संधी पक्षाकडे कधीही मागितली नाही, अन्यथा माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या हातून गेला नसता, आजही ते स्वतः अशी मागणी करण्यास उत्सुक नाहीत,

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार काम करणे, ते सोपवतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच त्यांची भूमिका राहिली आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्याना संजीवराजे तथा बाबा सतेच्या पदावर असावेत त्यामाध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा आहे, हेही श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यात ग्रामपंचायती पासून ते विधानसभेपर्यंत एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवण्याचे काम संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. ते सध्या महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने संजीवराजे यांना फलटण विधानसभा मतदार संघातून निवडून जाता आलेले नाही.

वास्तविक पाहता फलटण तालुक्यासह जिल्ह्यात संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी घेऊन संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी .शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती सौ. खरात व त्यांच्यासह सदस्यांनी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला उभारण्यात फलटणकरांनी जिल्हावासीयांच्या सहकार्याने पक्षश्रेष्ठीच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावली आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले आहेत.

 जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्टींनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा, अशी अपेक्षा शिवरुपराजे खर्डेकर व अन्य सहकारी पंचायत समिती सदस्यांनी केली आहे. 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख