नार्वेकरांचा बंगला 50 टक्के तोडला... आनंद झालेले सोमय्या निघाले पाहणी करायला!!

इतर नेत्यांच्या अनधिकृत बंगल्यांचे काय होणार?
नार्वेकरांचा बंगला 50 टक्के तोडला... आनंद झालेले सोमय्या निघाले पाहणी करायला!!
Milind Narvekar bunglow

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा अनधिकृत ठरलेल्या बंगल्याचे 50 टक्के बांधकाम सोमवार दुपारपर्यंत पाडण्यात आले आहे. कोणतीही नोटीस नसताना स्वतःहून हे बांधकाम पाडल्याबद्दल शिवसेनेच्या आमदारांनी नार्वेकर यांचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे हा बंगला बेकायदेशीर असल्यासाठी उठाठेव करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी `पाडून दाखवलं`, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नार्वेकर यांचे कौतुक करताना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांचे असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याच धाडस दाखवतील का, असा सवाल केला आहे. 

नार्वेकर यांचा दापोली तालुक्यातील मुरुड येथे बंगल्याचे बांधकाम सुरू होते. मात्र, ते बांधकाम कुठलीही प्रशासकीय नोटीस नसतांना स्वतःहून रविवारपासून पाडण्यास सुरवात केली. आज सोमवारपर्यंत 50 टक्के बांधकाम पाडले गेले आहे.  हे पडलेले बांधकाम बघण्यासाठी सोमय्या जाणार आहेत. नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम हे किनारपट्टी नियमन क्षेत्रात (सीआरझेड) येत असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. यानंतर केंद्रीय समितीने येथील कामाची पाहणी करून गेली होती. बांधकामाबात सोमय्या यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. 

या पार्श्वभूमीवर सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भारतीय जनता पक्षातील खासदार, आमदार व नेत्यांची अनेक बांधकामे अनधिकृत असल्याच म्हटलं आहे. एखादी गोष्ट आपल्याकडून चुकीची घडली की, ती सुधारायची असते. नार्वेकरांसारखा चांगला पायंडा भाजपमधील नेते मंडळी व केंद्रीय मंत्री राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व अन्य ठिकाणी त्यांचे असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याच धाडस दाखवणार का, असा सवाल आमदार नाईक यांनी विचारला आहे. नाईक यांच्या आव्हानाला भाजपकडून काय उत्तर मिळते हे बघणे औत्सुक्याचे  ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in