Guardian Minister Conducted Inspection Of Grade Separator With Shivendraraje | Sarkarnama

साताऱ्यात तीव्र पडसाद : पालकमंत्र्यांनी शिवेंद्रराजेंना बरोबर घेतले...पण उदयनराजेंना टाळले!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 जून 2020

शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन पालकमंत्र्यांनी केलेली ग्रेड सेपरेटरची पहाणी उदयनराजेंच्या समर्थकांना चांगलीच लागली आहे. सर्व समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. मुळात राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना पहाणी करण्यासाठी बोलवायला हवे होते. मात्र, पालकमंत्र्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन उदयनराजेंना का टाळले, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

सातारा : सातारा शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सध्या काम सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाची काल (सोमवारी) पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत पहाणी केली. या पहाणीवेळी साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही सोबत होते. मात्र, ज्यांनी ग्रेड सेपरेटरचे काम मंजूर करून आणले ते भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मात्र, साधे निमंत्रणही दिले नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. यानिमित्ताने ग्रेड सेपरेटरच्या कामाचे नेमके श्रेय कोणाला.. असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

सातारा शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या पोवईनाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी येथे उड्डाण पुल करावा, असे सूचविले होते. मात्र, आगामी 40 वर्षाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी या कामाचा प्रस्ताव करून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजांनी मागणी केलेल्या कामाला श्री. फडणवीस यांनी तात्काळ मंजूरी दिली. त्यामुळे पोवईनाक्‍यावर ग्रेड सेपरेटर म्हणजेच भुयारी मार्गाला हिरवा कंदील मिळाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुमिपूजन झाले. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. 60 कोटी रूपयांचे हे काम 2020 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे टेंडरही झाले. हे टेंडर टी ऍण्ड टी कंपनीला मिळाले.

प्रत्यक्ष कामही धडाक्‍यात सुरू झाले. पण मध्यंतरी कामाच्या आराखड्यात थोडा बदल केल्याने त्याची किंमत वाढली. त्यानुसार 15 कोटी वाढवून 75 कोटींचे हे काम सुरू झाले. या कामासाठीचे सर्व श्रेय खासदार उदयनराजे भोसले यांना जाते. आतापर्यंत 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्यात सातारा ते कराडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

त्यामुळे साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. दिलेल्या मुदतीत हे काम टी ऍण्ड टी कंपनीने पूर्ण केले आहे. कोरोनाच्या काळात मजूरांची टंचाई निर्माण झाली तरी या कंपनीने काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे. या कामाची पहाणी काल (सोमवारी) सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, तसेच भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपअभियंता राहूल अहिरे उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात येऊन आढावा बैठक घेऊन गेले. जाताना त्यांनी सर्वच कामांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सध्या अपूर्ण असलेल्या व पूर्ण होत आलेल्या कामांची पहाणी करण्याची सूचना पालकमंत्र्यांना केली होती.

त्यानुसार बाळासाहेब पाटील यांनी ग्रेड सेपरेटरची पहाणी केली. तसेच 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ही उपस्थित होते. पण ग्रेड सेपरेटर ज्यांनी साताऱ्यात आणला त्या खासदार उदयनराजे भोसले यांना मात्र, कोणीही या कामाच्या पहाणीसाठी बोलावले नाही.

शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन पालकमंत्र्यांनी केलेली ग्रेड सेपरेटरची पहाणी उदयनराजेंच्या समर्थकांना चांगलीच लागली आहे. सर्व समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. मुळात राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना पहाणी करण्यासाठी बोलवायला हवे होते. मात्र, पालकमंत्र्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन उदयनराजेंना का टाळले, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख